सामाजिक उपक्रमातून माजी खा. शृंगारे यांचा वाढदिवस साजरा

उदगीर (एल.पी. उगिले)
लातूर जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे नेते तथा माजी खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या वाढदिवसा निमित्त उदगीर येथे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सामाजिक जाणीव जपणाऱ्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातूनच साजरा केला पाहिजे, असे विचार या कार्यक्रमाचे संयोजक तथा सम्राट मित्र मंडळाचे संस्थापक उमाकांत बनसोडे यांनी व्यक्त केले. उदगीर शहरातील विविध रुग्णालयामधून रुग्णांना आणि नातेवाईकांना अल्पोपार आणि फळे वाटप, तसेच नगरपरिषदेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या बेघर निवारा केंद्रात राहत असलेल्या नागरिकांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन सम्राट मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
सत्ता असो अगर नसो, सामाजिक जाणीवा जपत गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्याचा माजी खासदार सुधाकरराव शृंगारे यांचा आदर्श कार्यकर्त्यांनी जपावा, आणि कोणताही स्वार्थ न ठेवता जनतेला सहकार्य करावे. असे आवाहनही याप्रसंगी संयोजकांच्या वतीने करण्यात आले.
केवळ एक दिवसच कार्यक्रम न घेता, सामाजिक कार्यक्रमाची रेलचेल सतत चालू ठेवली जाईल. अशी ही माहिती उमाकांत बनसोडे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितली.
“जे का रंजले गांजले….” या संत वचनाप्रमाणे माजी खासदार सुधाकरराव शृंगारे आपल्या परीने सतत लोकांना मदत करत असतात. त्यांची ती परोपकारी भूमिका कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे. आपल्या परीने जेवढे शक्य असेल तेवढे समाजातील उपेक्षित घटकांना मदतीचा हात देऊन त्यांनाही सबळ करावे, असेही आवाहन उमाकांत बनसोडे यांनी याप्रसंगी केले.