तळेगावकरांच्या चेल्याचं राजकारण भलतच गाजलं !!भल्याभल्यांना जिरवत, लातूरकरांनाही पाणी पाजलं ?
उदगीर (रोखठोक: ॲड. एल. पी. उगीले
सहकार क्षेत्राच्या राजकारणामध्ये सहकार महर्षी रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांचे नाव अजरामर आहे. पूर्वी उस्मानाबाद आताचे धाराशिव जिल्हा असताना उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेवर देखील रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांनी वर्चस्व ठेवले होते. उस्मानाबाद जिल्हा विभाजनाच्या नंतर लातूर जिल्हा झाला. त्यावेळी रामचंद्रराव पाटील तळेगावकर हे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत होते. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांचे वर्चस्व कायम राहीले. पुढे काही कारणाने निलंगेकर आणि तळेगावकर यांच्यामध्ये मतभेद झाले, तेव्हा रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांनी जिल्हा बँकेमध्ये आपल्याला साथ हवी म्हणून देशमुख परिवाराला सोबत घेऊन जिल्हा सहकारी बँक ताब्यात घेतली. एका अर्थाने जय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळे देशमुखांच्या सहकार क्षेत्राला चार चांद लागले त्या सहकार क्षेत्रामध्ये देशमुखांना रामचंद्र पाटील तळेगावकरांनी आणले. असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण तो इतिहास आहे. रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांनी दिलीपराव देशमुख यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आणले. पुढे याच बँकेच्या कामकाजामुळे देशमुखांची वेगळी छाप निर्माण झाली.
लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे वर्चस्व देशमुखांच्या आशीर्वादाने आणि वर्चस्वानेच गाजले होते, खरे तर देशमुखांचे शिलेदार प्रमाणिक असतानाही काही लोकांनी कान भरल्यामुळे, हलक्या कानाच्या देशमुखांनी सहकार महर्षी रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांना दूर करत, त्यांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला. ज्या तळेगावकरांनी देशमुखांना जिल्हा बँकेत आणले, त्याच तळेगावकरांना जिल्हा बँकेतून बाजूला सारण्याचे षडयंत्र देशमुखांनी रचले. सत्ता असल्यामुळे रामचंद्र पाटील तळेगावकर यांच्यावर खोट्या नाट्या केसेस केल्या, पुढे त्या केसेस मधून रामचंद्रराव पाटील तळेगावकर निर्दोष निघाले. मात्र दरम्यान राजकारणामध्ये सेटबॅक बसला होता. तरीही प्रचंड महत्वकांक्षी आणि शून्यातून आपले विश्व निर्माण केलेले रामचंद्रराव पाटील तळेगावकर सत्तेच्या विरोधात लढा देत देशमुखांशी झुंजत राहिले.
पुढे त्यांचे चिरंजीव भगवानदादा पाटील तळेगावकर यांना देखील देशमुखांनी ठिकठिकाणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु “बाप से बेटा सवयी” म्हणतात, तसे भगवानदादा पाटील यांनी सहकाराचे बाळकडू घेतलेले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी एकाकी झुंज देत, विजयश्री खेचून आणली. देशमुखांचा प्रचंड पैसा, दबाव तंत्र या सगळ्याला झुगारून देत भगवानदादा पाटील तळेगावकर यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपच्या पॅनल मधून संचालक म्हणून विजयश्री खेचून आणली.
त्याच पद्धतीने उदगीर तालुक्यामध्ये गढी आणि आशियाना यांच्या सल्ल्या शिवाय पत्ता हालत नव्हता, मात्र त्या एकाधिकारशाहीला देखील भगवानदादा पाटील तळेगावकर यांनी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धक्का देत, सर्वाधिक मते मिळवत संचालक पद मिळवले. त्यांच्या पॅनल मधील काही संचालक किरकोळ फरकाच्या मतांनी पराभूत झाले. मात्र देशमुखानी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करून काँग्रेसचे पॅनल निवडून आणले, मात्र पुन्हा त्या पॅनल मधील पाच संचालकांना अपात्र ठरवत भरत चामले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशमुखाना झटका दिला, हेही नाकारून चालत नाही. उदगीरच्या राजकारणामध्ये लातूरचे कायम वर्चस्व राहील असा देशमुख परिवाराचा प्रयत्न असायचा, मात्र नुकत्याच झालेल्या स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ, मर्यादित उदगीर या सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या संस्थेच्या निवडणुकात मात्र रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांचे मानसपुत्र आणि सहकार महर्षी भगवानदादा पाटील यांचे चेले म्हणून ओळखले जाणारे भरत तुकाराम चामले यांनी आपल्या सहित पॅनल बिनविरोध निवडून आणत देशमुखांच्या एकाधिकारशाहीला कोलदांडा घातला आहे.
किरकोळ गोष्टीसाठी आशियाना नाहीतर गढी गाठणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या सहकार क्षेत्रातील नामांकित स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र पुरते तोंडघशी पडल्याने, येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये देखील तळेगावकरांची कुटनिती, विद्यमान आमदार संजयभाऊ बनसोडे यांची राजनीती आणि त्यांना साथ देणाऱ्या भाजप आणि मित्रपक्ष यांची महायुती, निश्चितपणे महाविकास आघाडीला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. अशी चर्चा राजरोसपणे चालू आहे.
भरत तुकाराम चामले,शेतकऱ्याचा मुलगा, अर्थात तोही स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा, प्रचंड स्वाभिमानी परंतु तितकाच निष्ठावान! असल्यामुळे राजकारणात एक वेगळे अधिष्ठान त्याला प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून एकनिष्ठपणे पक्षाने दिलेली जबाबदारी ते राबवतात, मितभाषी आणि प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या भरत चामले यांना नेत्यांच्या आदेशाचे पालन करण्यामध्ये सार्थकता वाटते. त्यामुळेच त्यांच्या या कार्यपद्धतीची पारख असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य कापूस फेडरेशनच्या संचालक पदासाठी मराठवाड्यातून बिनविरोध संचालक म्हणून निवडून आणले होते. तेव्हापासून भरत चामले यांना ना. अजित पवार यांचा निकटवर्ती कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. उदगीर तालुका खरेदी विक्री संघाचे संस्थापक रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांनी आपला मानसपुत्र भरत चांगले हा समर्थपणे शेतकऱ्याचे हित जोपासत काम करेल, असा विश्वास वाटल्यावरून खरेदी विक्री संघाचा कारभार त्यांच्या हाती सोपवला होता. त्या विश्वासाला पात्र ठरत भरत चामले यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने खरेदी विक्री संघाचे काम करून दाखवले. ज्यांच्यामुळे आपल्याला हा मान मिळाला, त्याची जाण ठेवत भरत चामले यांनी या खरेदी विक्री संघाला स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ असे नामकरण करून आपली निष्ठा दाखवून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनिष्ठपणे आणि कसलाही स्वार्थ न ठेवता कार्य करत असल्यामुळे सर्व नेत्यांच्या तोंडात भरत चामले यांचे नाव असते. त्यांची संघटन कुशलता आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याची त्यांची शैली विचारात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी उदगीरचे आमदार तथा माजी मंत्री संजयभाऊ बनसोडे यांच्या सल्ल्या नुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीवर भरत चामले यांना घेतले आहे.
आपल्या नेत्याचा विश्वास सार्थ ठरवत उदगीर विधानसभा मतदारसंघातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीची लढाई भरत चामले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पारड्यात टाकली आहे! असे म्हटले तर वावगे होणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान आ. संजय भाऊ बनसोडे, भाजपचे नेते माजी आ. गोविंद केंद्रे, सहकार महर्षी भगवानदादा पाटील तळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध काढत भरत चामले यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
भरत चामले यांच्या नेतृत्वाखाली स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्वसाधारण सोसायटी प्रतिनिधी गटातून हारमुंजे किशनराव बापूराव, पाटील शंकरराव रामचंद्रराव,
मुळे विठ्ठल दिगंबर, बिरादार रामराव व्यंकटराव, बिरादार विजयकुमार ईरवंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच महिला सोसायटी प्रतिनिधी मतदारसंघातून देवणे उदयमाला शाहूराज आणि पाटे अशा सतीश या दोघींची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सर्वसाधारण व्यक्तिगत प्रतिनिधी मतदारसंघातून काळे बाबासाहेब शेषराव, पाटील प्रभाकर व्यंकटराव, पाटील व्यंकटराव नामदेवराव यांची निवड झाली आहे. तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून सोनकांबळे वसंत नारायण यांची तर विमुक्त व भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून पवार मारुती पोमा आणि इतर मागासवर्गीय मतदार संघातून चामले भरत तुकाराम यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बी. एस. नांदापूरकर यांनी केली आहे.
तेरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकांमध्ये केवळ पाटील व्यंकटराव नामदेवराव हे विरोधी गटाचे संचालक असल्याचे बोलले जात आहे.
इतर 12 संचालक हे भरत चामले यांच्या पॅनल मधले आहेत. उदगीर, देवणी, जळकोट आणि चाकूर या चार तालुक्यांमध्ये मतदार विभागलेले असलेली मोठी बाजारपेठ म्हणून नामांकित असलेल्या स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये भरत चामले यांनी एकतर्फी विजय संपादन केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या विजयाचे श्रेय उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय भाऊ बनसोडे, माजी आ. गोविंद केंद्रे, सहकार महर्षी भगवानदादा पाटील तळेगावकर आणि आपल्या सहकारी मित्रांना जाते. असे विचार प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भरत चामले यांनी व्यक्त केले आहेत.
