आ. रमेशआप्पां कराड त्यांच्या हातून सातत्याने सत्कर्म घडावे; अश्रू पुसण्याची ताकद परमेश्वराने त्यांना द्यावी – हभप गहिनीनाथ महाराज औसेकर
लातूर (एल पी उगिले) भाजपा कार्यकर्त्यां बरोबरच लातूर ग्रामीण मतदार संघातील अडीअडचणी सोडवण्याची आणि ज्यांच्या, ज्यांच्या डोळ्यात पाणी येईल, त्यांचे अश्रू पुसण्याची ताकद आ. रमेशआप्पा कराड यांना सातत्याने मिळावी. एक लाख रुपयातून एक काम होते, मात्र एका आशीर्वादाने एक लाख कामे होतात. असा आशीर्वाद त्यांना परमेश्वराने द्यावा. अशा शुभेच्छा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिल्या.
आ. रमेशआप्पा कराड मित्र मंडळाच्या वतीने लातूर येथील दयानंद सभागृहात जन्मदिनाच्या निमित्ताने भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड आणि त्यांची सुविद्यपत्नी सौ. संजीवनीताई कराड यांचा पंढरपूर येथील विठ्ठलरुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आशीर्वादपर मनोगत व्यक्त करताना औसेकर महाराजांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी औसा विधानसभेचे आ. अभिमन्यू पवार, भाजपा नेत्या डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर, मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, कार्याध्यक्ष विक्रमकाका शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
माणसं प्रेम करणारे असतात, पण मित्र जीवाला जीव देणारे असतात, माणसाचं नातं तुटतं मात्र जीवाचे नाते कधीच तुटत नाही. असे सांगून मित्र मंडळाच्या वतीने दृष्ट लागेल अशा अत्यंत सुरेख कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल धन्यवाद देऊन हभप गहिनीनाथ महाराज यावेळी बोलताना म्हणाले की, जन्मदिवस साजरा का करावा? मित्र कसा असावा? माणसाने कसे वागावे? याबाबत शास्त्राची पुरावे देऊन जन्मदिवस प्रत्येकाने साजरा केलाच पाहिजे असे बोलून दाखविले.
जीवनात माणसाची विचार प्रणाली फार महत्त्वाची असते. सतत संघर्ष करणाऱ्या, दूरदृष्टी असणाऱ्या लढवय्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत काम करण्याची दिशा ठरवून रमेशआप्पानी राजकीय जीवनात काम सुरू केले. सत्यासाठी लढत राहिले पाहिजे, ही त्यांची कायम धारणा राहिली. सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नावर संघर्ष केला. अनेकांना मदत केली. जन्मदिनी स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण विधानसभेत निवडून आणण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. यासाठी तब्बल 14 – 15 तास उभे राहून कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करणारे एकमेव नेते आहेत, असेही औसेकर महाराज यांनी बोलून दाखवले.
कराड कुटुंब वारकरी सांप्रदायिक आहे. नियमित पंढरपूरची वारी करणारे आहे. हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून हभप गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, संत ज्ञानेश्वराचे पसायदान महाराष्ट्र पुरते मर्यादित न ठेवता जगाच्या पाठीवर पोहोचविण्याची काम कराड कुटुंबांनी केले आहे. त्यागमूर्ती प्रयागआक्का कराड, विश्वधर्मी वि दा कराड यांचे संस्कार रमेशआप्पांवर आहेत. येणाऱ्या काळात त्यांच्या हातून सर्वसामान्यांची सेवा घडेल असे आशीर्वाद दिले.
प्रारंभी मित्र मंडळाचे नवनाथ भोसले यांनी प्रास्ताविकातून जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली, तर शेवटी रामचंद्र तिरुके यांनी आमदार रमेशआप्पा कराड यांचे कर्तुत्व आणि नेतृत्व लातूर ग्रामीण मतदारसंघातील जनतेने स्वीकारले आहे, असे सांगून उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी भागवत सोट, ऍड. व्यंकट बेद्रे, रागिनीताई यादव, सतीश आंबेकर, जे के कुलकर्णी, महिंद्र गोडभरले, अनिल भिसे, प्रताप पाटील, डॉ एमपी जमादार, डॉ चंद्रकांत शिरोळे, सुरज शिंदे, शरद दरेकर, बन्सी भिसे, दशरथ सरवदे, शिवसिंह सिसोदिया, वसंत करमोडे, पद्माकर चिंचोलकर, हनुमंत बापू नागटिळक, सचिन मुंडे, श्रीपती मुंडे, ललिता कांबळे, अनुसया फड, राजकिरण साठे, पांडुरंग बालवाड, विजय चव्हाण, सिद्धेश्वर मामडगे, दत्ता सरवदे, आप्पासाहेब पाटील यांच्यासह आ. रमेश आप्पा कराड मित्र मंडळाचे सर्व सहकारी, पदाधिकारी, भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
