लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्यावतीने लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील १८ प्रभाग अध्यक्ष आणि २२ ग्राम कमिटी अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर
लातूर (एल पी उगिले) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लातूर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार पद देऊन सक्रिय करण्याचा निर्धार केला आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आ. अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस भवन येथे पदाधिकारी आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपस्थित राहून खा. डॉ. शिवाजीराव काळगे आणि आ. अमित विलासराव देशमुख यांनी प्रभाग निहाय निवडी करून सदरील नियुक्ती पत्रांचे वाटप केले.
पदाधिकाऱ्यांची सदरील नियुक्ती म्हणजे काँग्रेस पक्षाने व्यक्त केलेला विश्वास आहे. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पक्षाचा विचार आपल्या भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली असल्याचे याप्रसंगी बोलताना सांगून सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे आ. देशमुख यांनी अभिनंदन केले.
वर्षभरापूर्वी झालेली लोकसभा निवडणूक, आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीचा बारकाईने अभ्यास करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठीची तयारी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुरू करावी, असे आवाहन ही याप्रसंगी केले.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे संदर्भ वेगळे असले तरी काही गोष्टी या एकसारख्याच असतात, त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाला मिळालेली आणि विरोधी पक्षांना गेलेली मते याचा बारकाईने अभ्यास केला तर निवडणूक जिंकण्याचे तंत्र आपणाला अवगत होऊ शकेल असेही या प्रसंगी सांगितले.
यापूर्वीच्या निवडणुकीत झालेल्या चुका कशा टाळता येतील, मतभेद बाजूला सारून सर्वांना एकत्र आणण्यासाठी काय करावे लागेल? उमेदवाराची निवड कोणत्या पद्धतीने करावी लागेल? या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा एक अभ्यासगट स्थापन करून लगेच कामाला लागावे, अशा सूचनाही प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.या घडामोडीवरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे.
