पत्रकार गजानन जिद्देवार यांच्यावर वाळूमाफियांचा जीवघेणा हल्ला; अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

0
पत्रकार गजानन जिद्देवार यांच्यावर वाळूमाफियांचा जीवघेणा हल्ला; अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

नांदेड (प्रतिनिधी) हिमायतनगर तालुक्यातील वीरसनी येथे अवैध वाळू साठ्याच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या आष्टी (ता. हदगाव) येथील पत्रकार गजानन जिद्देवार यांच्यावर वाळूमाफियांनी भ्याड हल्ला केला. मराठी डिजिटल पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष असलेल्या जिद्देवार यांना जबर मारहाण करत दोन्ही मोबाईल फोडण्यात आले आणि त्यांच्यावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गजानन जिद्देवार यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार, वीरसनी शिवारातील गायरान जमिनीत मोठ्या प्रमाणात वाळू साठा करण्यात आला होता. हा साठा तहसील प्रशासनाने जप्त केला होता, आणि त्याचा लिलावही निश्चित करण्यात आला होता. त्याबाबत माहिती घेत वृत्तांकन करत असताना, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेख अफरोज आणि सोनू देवसरकर यांनी जिद्देवार यांना विचारले, “तूच आमच्या विरुद्ध तहसीलदार कडे तक्रार केलीस का?” आणि त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली.
सात ते आठ ट्रॅक्टर चालकांसह अन्य आठ ते दहा अज्ञात आरोपींनी जिद्देवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, मोबाईल फोन फोडले आणि अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी, खिशातील ५ हजार रुपये, तसेच वृत्तांकनासाठी वापरलेले मोबाईल फोन हिसकावून नेण्यात आले.या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गु.र.न. 120/25 नुसार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 119(1), 118(1), 115(2), 351(2), 189(2), 199(2), 191(2), 191(3), 190, 324(4), 324(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सर्व आरोपी अद्याप फरार आहेत.
घटनेनंतर पत्रकारांमध्ये संतापाची लाट असून, पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या हल्ल्याचा मराठी डिजिटल पत्रकार संघ, हदगाव तालुका अध्यक्ष मारुती काकडे, महेंद्र धोंगडे व इतर पत्रकारांनी निषेध नोंदवून पोलिस प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!