होळसमुद्र येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
उदगीर (एल पी उगिले) सीमाभागातील कमालनगर तालुक्यातील होळसमुद्र येथे नाथ व्हॅली पब्लिक स्कूल तोरणा रोड येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पारंपारिक शेती, निसर्ग आणि आव्हाने या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून राज्य कृषी पुरस्कार प्राप्त व आदर्श शेतकरी अंकुश लक्ष्मणराव वाडीकर हे होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. योगिता मारुती आळंदे या होत्या. ही तर प्रमुख पाहुण्यांमध्ये उषाताई कुंडले, कमल नगरचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर निरणे, पी के पी एस सोसायटीचे अध्यक्ष अनिल शिंदे , राज्य कृषी पुरस्कार प्राप्त गोविंद इंगळे , विमल फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश शिंदे, तसेच प्रवीण कुलकर्णी, अशोक म्हत्री, राहुल पाटील, भरत कदम व कार्यक्रमाचे संयोजक हिंदवी चॅरिटेबल सोसायटी होळसमुद्र अध्यक्ष ॲड. धनाजी श्रीकांतराव कुंडले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक भाषण ॲड. धनाजी श्रीकांतराव कुडले यांनी सादर केले. आम्ही नगदी पिकाच्या मागे लागून, वेगवेगळे औषध वापरून जमिनीचा कस बिघडून टाकत आहोत. व अनेक रोगांना आमंत्रण देत आहोत. दहा वर्षात जमीन सतत नापीक होत आहे. त्यामुळे आपण पारंपारिक सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, असे मत व्यक्त केले. चंद्रशेखर निरणे यांनी पूर्वीच्या अन्नात जे जीवनसत्व होते , जी शक्ती होती, ती आज राहिलेली नाही. अलीकडे तर आम्ही निसर्गावर खूप अतिक्रम करतो. म्हणून उन्हाळा,p पावसाळा ऋतू मध्ये बऱ्याच प्रमाणात बदल झालेला आहे. असे मत व्यक्त केले. अंकुश वाडीकर यांनी भारत हा कृषिप्रधान देश असून 70 % लोक शेतीपूरक अनेक व्यवसाय करतात. ‘कृषी’ हीच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलून व्यवसायिकता शेतीत आणली पाहिजे. कमी खर्चात जास्त उत्पन्न करणारी शेती ही आमच्या डोक्यात बसवली पाहिजे. जमिनीचा पी,एच वाढलेला आहे, व क्षार वाढल्यामुळे पोत कमी झालेला आहे. अनेक कृषी विद्यापीठाच्या सल्ल्याने जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याच्या हव्यासापोटी जास्तीत जास्त खते वापरून जमिनीची पोत बिघडून गेलेली आहे. पारंपारिक शेती करायचा असेल तर आजोबांच्या, पंजोबाच्या काळातील शेती ही योग्य होती. कंपोस्ट खत त्यांनी तयार करून पिकाला जमिनीत टाकत होते .त्यामुळे जमिनीची पोत वाढलेली होती. सेंद्रिय खते जमिनीत मिळत होते. पिकाच्या खालच्या अवस्था, पिकापासून वरच्या अवस्था, फुलाची अवस्था आणि फळाची अवस्था अशा चार टप्प्यावर सविस्तर माहिती दिली. व जमिनीमध्ये 16 प्रकारचे अन्न,मूलद्रव्य असतात त्या सर्व मूलद्रव्याचे सविस्तर अशी माहिती दिली.
सतीश शिंदे यांनी आपली भावना व्यक्त करताना प्रथम शेती, मध्यम व्यापार ,कनिष्ठ नोकरी पूर्वी समजली जात होती. आज उलट परिस्थिती झालेली आहे. पूर्वी शेतीला महत्त्व होतं पण आज नोकरीला महत्त्व दिल जात आहे. हे क्षणिक समाधान आहे. युवा पिढी शेतीकडे वळले पाहिजे असा सल्ला दिला. गोविंदराव इंगळे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, माणसाने वाढदिवसाला दोन तीन हजार खर्च करण्यापेक्षा आपल्या शेताच्या बाजूने लिंबाची किंवा फळाची झाडे लावावी, असे मत व्यक्त केले. कु.लक्ष्मी चौहान यांनी शेतीपूरक कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी हिरहिरेने भाग घ्यावे, व शेतकऱ्यांच्या कार्यक्रमास आवश्यक तिथे सर्व शेतकरी उपस्थित राहावे. अशी भावना व्यक्त केली.मी ह्या भागात विद्यार्थी घडवण्यासाठी आलेली आहे आणि प्रत्येक छोट्या छोट्या बाळांना मी आमच्या शाळेत विद्यार्थी घडवत आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघून या भागातील विद्यार्थी आमच्याकडे यावे व शिक्षणाचा सर्वांगीण विकास व्हावा, याकरिता आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत असे मत व्यक्त केले .
यावेळी कमाननगर ,बालूर ,तोरणा, मुदोळ, चांदोरी ,हल्लाळी ,सावळी, मुर्की, खदगाव, अशा विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने आले होते. गोपाळराव पाटील, पांडुरंग पाटील, महादेव बन्ने , सतीश भुरे, बाळू भुताळे, दत्तू कुडले, लक्ष्मण कदम, तुकाराम जाधव, प्रशांत वडगिरे, संजय बिन्ने ,शिवप्पा बन्ने, मल्लिकार्जुन माथीमाडे, विष्णू रेनुदनूरे, प्रदीप पाटील, मधुकर हांडे, गोविंद वाडीकर व सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत गीत सौ. शिवमंगला दाना, लक्ष्मी बेले यांनी म्हटले. तर कु.अंजली सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले.
