प्रत्येक सुजाण नागरिकांनी ग्राहक जनजागृती सेवा संस्थेचा भाग बनावे – अभिजीत औटे
उदगीर (एल पी उगिले) प्रत्येक नागरिक हा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातील ग्राहक आहे. सध्या ग्राहकाला लुबाडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवा विकसित करून ग्राहक जनजागृती सेवा संस्था च्या वतीने महाराष्ट्र राज्यभर ग्राहक जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. ग्राहक चळवळ अधिक मजबूत होऊन ग्राहकांना न्याय देण्यासाठी, ग्राहक जनजागृती सेवा संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा आणि तालुका आणि गाव पातळीवरील सामाजिक जाणीव जपणाऱ्या आणि समाजसेवेची आवड असलेल्या तरुणांनी आपापल्या परिसरात ग्राहक अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. जे इच्छुक आहेत, त्यांनी या संस्थेच्या अभियानात सहभागी होऊन पदाधिकारी बनावे, आणि ग्राहक चळवळीचे जाळे व्यापक स्वरूपात निर्माण करण्यास मदत करावी. असे आवाहन या संस्थेचे संस्थापक अभिजीत औटे यांनी केले आहे.
सध्या ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे ऑनलाइनच्या माध्यमातून ग्राहकाची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. फसवणूक झालेले बहुतांश ग्राहक गप्प राहतात, आपली प्रतिष्ठा जाईल. या भीतीपोटी ते आपले नुकसान सहन करतात, हे चुकीचे आहे. कारण त्यांच्या या प्रवृत्तीमुळे लूट करणारे आणि गुन्हे करणाऱ्या लोकांची हिम्मत वाढते. त्यासाठी सामाजिक हित जोपासत नागरिकांची जनजागृती करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे. समाजसेवे सोबतच राष्ट्रहित जोपासवे, असेही अभिजीत औटे यांनी आवाहन केले आहे.
