पिंपरी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर मार्फत खरीपपूर्व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल पी उगिले)
कृषी विभाग, भारत सरकार यांच्या मार्फत प्रायोजित विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ अंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर मार्फत दत्तक ग्राम पिंपरी ता. उदगीर येथे शेतकऱ्यांना खरीप हंगामात पशुधन व शेती पिके यांचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शनपर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोककुमार देवांगरे यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक भोसले होते तसेच मंचावर प्रमुख व्याख्याते डॉ. रवीराज सूर्यवंशी डॉ. राम कुलकर्णी, डॉ. विवेक खंडाईत, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, मंडळ कृषी अधिकारी पी. व्ही. फुले, सहाय्यक कृषी अधिकारी, एम. एच. भंडे, प्रतिष्ठित नागरिक रत्नाकर बिरादार, दत्ताजी केंद्रे व कॅरस फार्मसिटीकल्सचे अधिकारी सय्यद हे उपस्थित होते. या मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. अशोक भोसले यांनी रेबीज आजार व प्रतिबंध, डॉ. राम कुलकर्णी यांनी मानवी आहारात अंड्याचे महत्व, डॉ. विवेक खंडाईत यांनी मानवी आहारात दुधाचे महत्व, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी पशुधनासाठी चारा उत्पादन व व्यवस्थापन, जंतनिर्मूलन, लसीकरण यावर मार्गदर्शन व चाटण विटांचे महत्व विषद करण्यासाठी प्रात्यक्षिक, एम एच. भंडे यांनी बीज प्रक्रिया, खरीप पिके लागवड व व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. रत्नाकर बिरादार यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या अभियान अंतर्गत पिंपरी येथील पशुधनास घटसर्प लसीकरण व जंतनिर्मूलन करण्यात आले. मार्गदर्शनानंतर उपस्थित शेतकऱ्यांना क्षार मिश्रण, क्षार युक्त द्रावण व इतर टॉनिक तसेच सुपर नेपियर गवताचे ठोंबे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासासाठी पिंपरी येथील ग्रामस्थ उत्स्फुर्तपणे सहभागी झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी दत्तक ग्रामचे नोडल अधिकारी डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रविराज सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. रविराज सूर्यवंशी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी विशेष कष्ट घेतले.
