2 लाख 18 हजार रुपयाचा वाहनासह अवैध दारूचा साठा जप्त.
लातूर (एल पी उगिले) परराज्यातून स्वस्तात दारू विकत घेऊन महाराष्ट्रामध्ये ज्यादा किमतीमध्ये विक्री करणारे रॉकेट सक्रिय झालेले आहे. काही ठिकाणी बनावट दारू देखील बनवली जात असल्याची चर्चा आहे. अशा पद्धतीने अवैध बनावट किंवा विषारी दारू बनवून मद्यपींच्या आरोग्याची खेळणाऱ्या लोकांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जावी, अशी सूचना वरिष्ठांनी दिल्यानंतर किल्लारी पोलिसांनी ठोस कारवाई करत दोन लाख 18 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॅा.विशाल शहाणे यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निलंगा ते लामजना जाणारे रोडवर सापळा लावून देशी विदेशी दारूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहनाला दारूच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन इसमाविरुद्ध पोलीस ठाणे किल्लारी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 11/06/2025 रोजी किल्लारी परिसरातून हुंडाई सेंट्रो कंपनीची कार क्रमांक एम.एच. 12 डी.एम.7660 या वाहनातून वीदेशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वरून किल्लारी पोलीस ठाण्याने बेकायेशीर रित्या अवैधपणे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये वेगवेगळ्या नावाची 18 हजार 480 रुपयाची विदेशी दारू व दोन लाख रुपये किमतीची सेंट्रो कार मिळून आली. देशी दारूची अवैध वाहतूक करीत असलेल्या दोन इसम नामे गजानन बाबुराव बिराजदार (वय 38 वर्ष, राहणार लामजना तालुका औसा जिल्हा लातूर), सत्यवान चंद्रभान सूर्यवंशी, (वय 40 वर्ष राहणार, मुगळेवाडी तालुका औसा जिल्हा लातूर). यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॅा.विशाल शहाणे यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार दत्तात्रय जाधव, गायकवाड यांनी केली आहे.
