महावितरण च्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून जनावराचा जागीच मृत्यु
महावितरण चा गलथान कारभार; नुकसान भरपाई देण्याची शेतकर्यांची मागणी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील नांदगाव येथे वादळी वार्यामुळे तुटलेल्या महावितरण विभागाच्या विद्युत वाहक तारेचा शॉक लागून जनावराचा ( रेडा) जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, दि 11 जुन वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास नांदगाव येथील शेतकरी बालाजी ज्ञानोबा ढमाले हे गेली अनेक वर्षांपासून दुध व्यवसाय करतात. ते नेहमी प्रमाणे आपली जनावरे चरणासाठी गावच्या शिवारात घेऊन गेले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वार्यामुळे महावितरण विभागाची विद्युत वाहक तार तुटून खाली जमीनीवर पडलेली होती. परिसरातील शेतकर्यांनी कर्मचारी यांना माहिती दिली होती तरी तार महावितरण विभागाने दुरुस्त केलीच नाही अशी चर्चा दबक्या आवाजात चालू होती. खाली तुटून पडलेली तार जनावराच्या पायाला चिकटली व लगेच शॉक लागून जनावराचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटनेमुळे शेतकर्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
