दोन बालसाहित्यिकांच्या साहित्यास नांदेड जिल्ह्यातील पुरस्कार

दोन बालसाहित्यिकांच्या साहित्यास नांदेड जिल्ह्यातील पुरस्कार

स्व. मातोश्री केवळबाई मिरेवाड पुरस्कार: बिबट्याचे पिल्लू व निसर्गाशी जुळवू नाते ग्रंथाची निवड.

उदगीर (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील नायगाव (बा.) येथील स्व. मातोश्री केवळबाई मिरेवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारे सन २०२० चे साहित्य पुरस्कारासाठी तालुक्यातील एकुर्का रोड येथील रहिवाशी, साहित्यिक संजय ऐलवाड व रसूल दा. पठाण यांच्या बालसाहित्याला जाहिर करण्यात आले आहेत.

या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अशोक कोळी, पांडूरंग पुठ्ठेवाड व संयोजक वीरभद्र मिरेवाड यांच्या संयोजन समितीने सन २०२० वर्षातील कथा, कविता व कादंबरी या गटातील पुरस्काराची घोषणा रविवारी केली. यात संजय ऐलवाड लिखित “बिबट्याचे पिल्लू” बालकथा संग्रह व रसूल दा. पठाण यांच्या “निसर्गाशी जुळवू नाते…” या बालकविता संग्रहाला जाहीर झाला आहे. प्रत्येक गटासाठी दोन हजार रोख रक्कम, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ऑगस्ट महिन्यात नायगाव (बा.) येथे माजी आ. व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सह बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील- चव्हाण, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुरेश सावंत नांदेड, बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड मुंबई, राज्य शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर जळकोट यांच्या हस्ते या पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक वीरभद्र मिरेवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. संजय ऐलवाड व रसूल दा. पठाण हे एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून मागील २० वर्षापासून पत्रकारिता, साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. साहित्यातील हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य प्रमोद चौधरी, प्रा. एम. व्ही. स्वामी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, जेष्ठ साहित्यिक विश्वनाथ मुडपे, मोतीलाल डोईजोडे, प्रा. रामदास केदार, दयानंद बिरादार, अनिता यलमटे, राज्य शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर व विलास सिंदगीकर, लक्ष्मण बेंबडे, सिद्धार्थ सुर्यवंशी, ज्योतीताई डोळे, नीता मोरे रविंद्र हसरगुंडे आदींनी अभिनंदन केले आहे.

About The Author