वारकरी परंपरा मानवी जीवनाला अर्थ प्राप्त करून देते – डॉ. शरदकुमार तेलगाने
उदगीर (एल पी उगिले)
मानवी जीवन यथार्थ करायचे असेल तर, अध्यात्माशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि अध्यात्मातील वारकरी संप्रदाय जी शिकवण देते ती अत्यंत सरळ साधी आणि सर्वांना सहज शक्य असेल अशा पद्धतीच्या भक्तिमार्गातून जीवन सार्थक बनू शकते. परमेश्वराच्या चिंतनामध्ये काही दिवस तरी घालावेत, या हेतूने देहू पासून पंढरपूर पर्यंत पाई दिंडी जाते. ही खरोखरच आनंददायी आणि समाधान देणारी बाब आहे. कारण या वारीमध्ये आपोआपच, “सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |”
या संत वचनाप्रमाणे संतांच्या संगतीचा जीवनावर मोठा परिणाम आपोआपच दिंडी मधून घडत असतो. असे विचार उदगीर येथील ओम हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम चे प्रमुख तथा प्रबोधनात्मक कीर्तनकार ह भ प डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केले. ते ह भ प रामकिशन महाराज सूर्यवंशी येनकीकर यांच्या आजमेळा दिंडी श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर रथापुढे अडत लाईन उदगीर येथून निघत असताना, ह भ प डॉ. शरदकुमार तेलगाने महाराज यांच्या हस्ते विधिवत श्रीफळ फोडून दिंडी प्रस्थान करताना ते बोलत होते.
याप्रसंगी दिंडीतील सहभागी वारकऱ्यासोबतच परिसरातील भक्तगणही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना ह भ प डॉ. शरदकुमार तेलगाने म्हणाले की, माणसाने जीवनात येऊन आत्मिक समाधान मिळवण्याच्या उद्देशाने परमेश्वराचे चिंतन करावे. संत साहित्य अभ्यासावे, संत साहित्यामधील ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जीवनात येऊन किंवा एक वेळेस तरी वाचावा आणि संत ज्ञानेश्वर म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी, म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक होऊ शकते. त्या अनुषंगाने आचरण करावे. स्वार्थ आणि परमार्थ यांची सांगड ज्यांना जमली त्यांचे जीवन निश्चितच सार्थकी लागले असे म्हणता येईल. विठुरायाच्या भक्तीने मग्न होऊन ही वारकरी मंडळी दिंडीमध्ये सहभागी होत आहेत. त्यांना शुभेच्छा ही याप्रसंगी देण्यात आल्या.
