कव्हा येथील विभागीय क्रीडा संकुलाची ई-निविदा अखेर निघाली!

0
कव्हा येथील विभागीय क्रीडा संकुलाची ई-निविदा अखेर निघाली!

माजी आ.कव्हेकर व युवा नेते अजित पाटील कव्हेकरांच्या प्रयत्नाला यश

लातूर (प्रतिनिधि)

राजकीय क्रीडांगण बनलेल्या कव्हा येथील विभागीय क्रीडा संकुल उभारणीची ई-निविदा नुकतीच काढण्यात आलेली आहे. दरम्यान शासनाच्या हालचाली लक्षात घेता विभागीय क्रीडा संकुल कव्हा येथेच होणार आहे. हे निश्‍चित झालेले आहे. त्या कामी कव्हा गावचे सुपूत्र माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व युवा नेते तथा भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला असून विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीवरून सुरू असलेल्या राजकारणाला आता पूर्णविराम मिळणार आहे.

लातूर तालुक्यातील विभागीय क्रीडा संकुलाचा प्रश्‍न दीर्घ काळापासून प्रलंबीत होता. 15 ऑगस्ट 2008 रोजी कव्हा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन कव्हा विभागीय क्रीडा संकुलासाठी 25 एकर जमीन मोफत दिली होती. 29 ऑक्टोबर 2013 रोजी 8 हेक्टर 79 आर जमीनीचा ताबा विभागीय संचालक क्रीडा व युवक सेवा विभाग यांना देण्यात आला. 2021 साली माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी याच कामासाठी न्यायालयीन लढा उभारून हे क्रीडा संकुल कव्हा-खोपेगाव याच ठिकाणी करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामध्ये यश मिळाले असले तरी या कामाबाबतची ई-निविदा प्रक्रिया सुरू न झाल्याने विभागीय क्रीडा संकुलाच्या कंम्पाऊंड वॉलचे काम पूर्ण होऊन उर्वरित काम रखडले होते. त्यानंतर लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता व उपलब्ध निधीच्या अनुषंगाने क्रीडा सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु या कामाची ई-निविदा मात्र रखडली होती. याबाबत भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रश्‍नबाबतचे निवेदन देताच या कामाची ई-निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जाहीर केली असून ई-निवीदा प्रणालीद्वारे 10 ते 17 जून या कालावधीत ऑनलाईन ई-कोटेशन मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे ई-निविदेची प्रक्रीया पूर्ण होण्याचा कालावधी 17 व 18 जुन 2025 रोजी ठेवण्यात आलेला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच विभागीय संकुलास गती मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कव्हा व पंचक्रोषीतील नागरीकामधून समाधान व्यक्‍त केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील – अजित पाटील कव्हेकर

नियोजित विभागीय क्रीडा संकुल उभारल्यानंतर या भागातील होतकरू खेळाडूंना नव्याने सुविधा उपलब्ध होणार आहेत. या शिवाय विद्यार्थी व तरुणाईला विविध खेळाबद्दल आकर्षन निर्णय होईल आणि यातूनच राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी चांगले खेळाडू तयार होतील. या कामाचे शुक्‍लकाष्ट संपले असून विभागीय क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री आ.संजय बनसोडे, आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, आ.अभिमन्यू पवार, आ.रमेशअप्पा कराड यांच्यासह या कामी मदत करणार्‍या सर्वांचे मी कव्हा गावचा सुपूत्र या नात्याने आभार मानतो. या सर्वांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणार्‍या विभागीय क्रीडा संकुलामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील अशी प्रतिक्रीया भाजपा युवा नेते तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!