प्रवेशोत्सवात पुस्तक वाटपासोबत राष्ट्रप्रेमाची झलक, कागदी टोप्यांतून तिरंग्याचे दर्शन
उदगीर (एल पी उगिले )
श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांचे स्वागत टाळ्यांच्या गजरात व पुष्पगुच्छांनी करण्यात आले. शासनाच्या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सचिव विनायकरावजी बेंबडे होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून उज्वल भवितव्य घडवावे असे सांगितले. मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही. यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवे वर्ष आत्मविश्वासाने सुरू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे शाळेचे कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप यांनी कागदी टोप्यांद्वारे साकारलेला तिरंगा. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शाळाप्रेम, देशप्रेम, संघभावना व सर्जनशीलतेचा विकास झाला.
या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
