परिश्रमाने असाध्य गोष्टी साध्य करता येतात – प्रा.प्रवीण जाहुरे
उदगीर (एल पी उगिले)
कोणत्याही क्षेत्रात उंची गाठण्यासाठी नियोजनबद्ध अथक परिश्रमाची गरज असते. अहर्निश प्रयत्नाने अशक्य गोष्टी साध्य करता येतात. असे मत प्रा.प्रवीण जाहुरे यांनी व्यक्त केले.
वाचक संवादाचे ३३९ वे पुष्प प्रा.प्रवीण जाहुरे यांनी नांदेड येथील बालरोगतज्ज्ञ डॉ.हंसराज वैद्य यांच्या असाध्य ते साध्य या ग्रंथावर गुंफले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. बळीराम भुक्तरे उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा.जाहुरे म्हणाले, स्थानिक इतिहास,शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी असाध्य ते साध्य हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. डॉ.हंसराज वैद्य हे अष्टपैलू होते. आरोग्य, क्रीडा, पर्यावरण व साहित्य इत्यादी क्षेत्रात त्यांचे खूप मोठे योगदान राहिलेले आहे. हा ग्रंथ म्हणजे एका अर्थाने आयुष्याचा जमाखर्च आहे. आत्मचरित्र लिहिल्यानंतरच व्यक्तीचे कर्तुत्व प्रकाशात येत असते आणि हे चरित्र अनेकांसाठी प्रेरक व मार्गदर्शक असते. असाध्य ते साध्य शून्यातून जग निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीच्या आयुष्याची लक्षणीय कहाणी आहे. ही आत्मकथा वाचून आपण त्याचा अनुभव घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आत्मचरित्र वास्तवावर आधारित असते. शिक्षणातून क्रांती कशी होऊ शकते याचे एक उदाहरण म्हणून वैद्य कुटुंबाकडे पाहावे लागेल. असे विचार अध्यक्षीय समारोपात डॉ. बळीराम भुक्तरे यांनी व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमास प्राचार्य विजयकुमार पाटील, प्राचार्य डॉ. शिवाजी सगर, प्राचार्य डॉ. नामदेव खंडगावे , उमाकांत वडजे , बिरादार आनंद, चंद्रकांत मळगे, सत्यजित येनकीकर, अर.बी. महाजन, मुरलीधर जाधव, अनिल पत्तेवार, डॉ. वैद्य, उषा तोंडचिरकर, अर्चना नळगिरकर , ज्योती डोळे, मंगला शेट्टे, रामराव ढगे, बाबूराव माशाळकर, डॉ. नरेंद्र शिंदे, डॉ. सुरेश शिंदे, कांता कलबुर्गे, मधुमती शिंदे आदींसह परिसरातील बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक व परिचय डॉ.म.ई.तंगावार यांनी तर सूत्रसंचालन वाचक संवादाचे संयोजक अनंत कदम यांनी केले. आभार डॉ.वर्षा वैद्य यांनी मानले.
