साने गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्तविद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
उदगीर (एल पी उगिले)
येथील डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव देविदासराव नादरगे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक पांडुरंगराव बोडके, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानोबा कुंडगिरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी साने गुरुजींचे ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना सादर केली. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानोबा कुंडगिरे यांनी केले.
विश्वनाथराव मुडपे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मातृहृदयी साने गुरुजी यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले व त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
प्रमुख पाहुणे पांडुरंगराव बोडके यांनी विद्यार्थ्यांना साने गुरुजींचे ‘श्यामची आई ‘ हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले.
विश्वनाथराव मुडपे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने देविदासराव नादरगे यांनी त्यांचे आभार मानले.
