उदगीर (प्रतिनिधी) येथील कल्पना चित्रपटगृहाच्या पुढे वळणावर कचऱ्याचा ढीग साचल्यामुळे, येथील नागरिकाचे व रहदारी करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले चित्र पाहावयास मिळत आहे. याची हकीकत अशी की, नगरपरिषद उदगीर व निडेबन यांच्या हद्दीत कल्पना चित्रपटगृहाच्या वळणावर रोडच्या दोन्ही बाजूस व रोडवर कचऱ्याचा ढीग बरेच दिवसापासून साचलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाकाला कपडा लावून प्रवास करावे लागत आहे. त्याचबरोबर या भागातील नागरिकांचे आरोग्य या कचऱ्यामुळे, धोक्यात आलेले आहे. या भागात अनेक शाळा व कै. बापूसाहेब एकंबेकर महाविद्यालय आहे. शाळेला व महाविद्यालयाला जाण्या येण्यासाठी विद्यार्थ्यांना हाच रस्ता आहे. त्यामुळे शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. याबाबतीत अनेक वेळा तक्रार करून देखील याची दखल कोणीच घेत नाही. या भागात नगरपालिका व निडेबन ग्रामपंचायत आहे किंवा नाही असेच म्हणावे लागेल. जर उदगीर नगर परिषद व निडेबन ग्रामपंचायत या उभयतांनी मिळून हे कचऱ्याचे ढीग नाही काढल्यास, या भागातील नागरिक, प्राध्यापक, विद्यार्थी हे आंदोलन करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात आले आहे. करिता लवकरात लवकर नगरपरिषद व ग्रामपंचायत निडेबन या उभयतांनी प्रयत्न करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.