हातभट्टीवाल्यांनी शक्कल लढवली लयभारी !!पण….त्यांची जिरवायला आलाय जांबाज अधिकारी !!
उदगीर (एल पी उगिले) उदगीर तालुक्यातील ग्रामीण हद्दीमध्ये तसेच परिसरात हातभट्टीच्या दारूचे प्रमाण वाढले होते. हातभट्टीच्या अड्ड्यावर वेळोवेळी धाडी टाकून देखील गावागावातून होणारी ही अवैध दारू विक्री थांबत नव्हती. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाने अनेक वेळा लक्ष ठेवून धाडीही टाकल्या होत्या. तरी देखील गावागावातून हातभट्टीची विक्री चालूच होती. उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देखील अशाच पद्धतीने हातभट्टीची दारू विकली जात आहे. याची गोपनीय माहिती सपोनी सुनील गायकवाड यांना मिळाली होती. सदरील माहितीच्या आधारे त्यांनी पाळत ठेवून काही महिला पाण्याचे जार घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन दारू विकतात, तसेच पाण्याच्या बॉटल्स मध्ये पाणीच आहे असे वाटावे अशा पद्धतीने हातभट्टीची दारू पाण्याच्या बॉटलमध्ये भरून विक्री केली जात होती.
हातभट्टीची दारू प्रामुख्याने वेगवेगळ्या तांड्यावर आणि वाडीवस्त्यावर बनवली जाते, तसेच तिथूनच ती शहरात किंवा इतरत्र विक्रीसाठी पाठवली जाते. कितीही पाळत ठेवली तरी सहजासहजी पोलिसांच्या किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीची शक्कल हातभट्टी दारू विकणाऱ्या लोकांनी लढवली होती.
सध्या ग्रामीण भागातही शुद्ध पाणी पिण्याकडे ओढा वाढला आहे. परिणामतः पाण्याचे जार आणि पाण्याच्या बाटल्या चा वापर वाढला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून या अवैध हातभट्टी चालकांनी अवैध दारू विक्रीसाठी पाण्याच्या जार मधून शहरात हातभट्टीची दारू पाठवण्याची आयडिया लढवली. मात्र नुकतेच वाढवणा पोलीस स्टेशनला रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी या अवैध दारू विक्रेत्यावर वचक निर्माण करत, यशस्वी धाड टाकली आहे.
उदगीर तालुक्यातील मौजे डोंगरशेळकी तांडा येथील रेणुका संतोष पवार (वय 34 वर्ष व्यवसाय मजुरी) यांच्या राहत्या घरी धाड टाकली असता, त्या ठिकाणी दोन पाण्याचे जार प्रत्येकी अंदाजे 20 लिटरची क्षमता असलेले तसेच पाच प्लास्टिकच्या बॉटल्स प्रत्येकी एक लिटर क्षमतेच्या भरून ठेवलेल्या आढळून आल्या. त्यामध्ये आंबट व उग्र वास येत असलेली हातभट्टीची दारू असल्याचे समजले. जवळपास 45 लिटर हातभट्टीची दारू साठवून ठेवली होती. आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी या अवैध दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने ही दारू साठवल्याचे लक्षात येताच, वाढवणा पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार तुकाराम बळदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गु.रं.न. 180 /25 कलम 65 (अ) (इ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही धाड यशस्वी करण्यासाठी वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस हवालदार संजय दळवी पाटील, तुकाराम बळदे, संजय कलकत्ते, सुखानंद बोईनवाड, शिवप्रताप रंगवाळ यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.
चौकट……
वाढवणा हद्दीतून हातभट्टी हद्दपार करणार…..
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्याच्या विरुद्ध मोहीम सुरू केली असून या मोहिमेमध्ये वाढवणा पोलीस स्टेशन अग्रेसर राहील. आणि अवैध हातभट्टी तसेच अवैध देशी दारू विक्री पूर्णपणे बंद केली जाईल. या धंद्यांना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून सर्व कर्मचारी त्यादृष्टीने कार्यरत असल्याचेही वाढवणा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी सुनील गायकवाड यांनी कळवले आहे.
