चंदन तस्करास 2 लाख 88 हजारा च्या मुद्देमालासह अटक, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई.
लातूर (ॲड. एल पी उगीले) लातूर जिल्ह्यातील चंदनाच्या झाडाची अवैध रीतीने तोड करून त्याचा गाभा पोत्यामध्ये भरून ठेवून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या चंदन तस्करास जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे तसेच त्याच्याजवळ दोन लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केला आहे. मध्यंतरीच्या काळात लातूर जिल्ह्यामध्ये चंदन तस्कराचे प्रमाण वाढले होते. या ठिकाणचे चंदन चोरी करून त्याची विक्री कर्नाटक किंवा तेलंगणामध्ये करण्याचा प्रयत्न सतत चंदन चोर करतात. असे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आता स्वतंत्रपणे विशेष शाखा स्थापन करून अवैध धंद्याला आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता विशेष पथकाची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सुचित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे मार्गदर्शनात विशेष पथकाला मिळालेल्या माहितीवरून औसा पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसी परिसरामधील हनुमान नगर येथील एका पत्राच्या शेडवर छापेमारी करण्यात आली. सदर शेडमध्ये प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तासलेला चंदनाचा गाभा व लाकडाची चोरटी विक्री करण्यासाठी साठवून ठेवले चंदन बाळगलेला एक इसम मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव,पत्ता विचारता त्याने स्वप्निल संजीव माने (वय 24 वर्ष राहणार आळवाई तालुका भालकी जिल्हा राज्य कर्नाटक) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 72 किलो चंदन तसेच चंदनाची लाकडे तोडण्या व तासण्या साठी लागणारे साहित्य, तराजू असा एकूण 2 लाख 88 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन औसा येथे कलम 41,42 भारतीय वन अधिनियम 1927 व कलम 4 महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, 303(2),3 (5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंगद कोतवाड, पोलीस अमलदार रामहरी भोसले, युसुफ शेख, चालक पोलीस अमलदार दीपक वैष्णव,कुंभार यांनी केली आहे.
