अध्यापक व प्राध्यापकांनी वाचन संस्कृतीचे पाईक व्हावे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अध्यापक व प्राध्यापकांनी वाचन संस्कृतीचे पाईक व्हावे - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
फुले महाविद्यालयाच्या ‘रौप्यमहोत्सवी’ वर्षानिमित्त प्राध्यापकांनी २५ ग्रंथ भेट देऊन अभिनव उपक्रम राबवला.
अहमदपूर (गोविंद काळे) : समाजाच्या निकोप वाढीसाठी वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक असून, मोठ्या प्रमाणात ग्रंथांचे वाचन करून अध्यापक व प्राध्यापकांनी वाचन संस्कृतीचे पाईक व्हावे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ग्रंथदान सोहळ्यात ते बोलत होते.
याबाबत अधिक माहिती अशी की येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा सध्या रौप्य महोत्सवी सुरू असून यावर्षी महाविद्यालयाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकांनी २५ ग्रंथ संपदा महाविद्यालयाच्या ग्रंथालयास दान वा भेट स्वरूपात द्यावेत असे आवाहन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी प्रत्येकी २५ ग्रंथ महाविद्यालयाच्या ग्रंथालयास दिले. या वेळी एकूण ३७५ ग्रंथ संपदा संकलित झाली आहे.
या ग्रंथदान सोहळ्यात पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, ग्रंथ वाचनाची व्यापक चळवळ उभी राहिली तरच येणारा समाज वाचणार आहे. सध्या नवी पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकल्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. समाजात वाचनाची आवड निर्माण करणारे उपक्रम राबविले पाहिजेत. प्रामुख्याने ही जबाबदारी समाजातील शिक्षक – प्राध्यापकांनी स्वीकारून ग्रंथालय चळवळ मजबूत करण्यासाठी, तसेच विद्यार्थी वाचक तयार करण्यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून पुढे आले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कवी व समीक्षक डॉ. मारोती कसाब, डॉ. बब्रुवान मोरे, कवी डॉ. दिगंबर माने यांनी मनोगत व्यक्त केले. आभार ह.भ.प. प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
