शिक्षण व संस्कृती जपण्याचे काम जेएसपीएम संस्थेकडून होत आहे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भगवत्गिता, कुराण, बायबल, रामायण हे धार्मिक ग्रंथ महत्त्वाचे आहेत. यातून जे आवश्यक आहेत ते आपण घ्यावे. अन् त्याच विचारावर आपली वाटचाल यशस्वीपणे करावी. हीच परंपरा कायम ठेवत जेएसपीएम संस्थेनेही अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारीत शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे. यातून नितीमुल्य, शिक्षण व संस्कृती जपण्याचे काम जेएसपीएम संस्था आजही करीत आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात महाराष्ट्र विद्यालयातील कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक निळकंठराव पवार, समन्वयक बापूसाहेब गोरे, प्राचार्य मोहन खुरदळे, मु.अ.(प्रा) सुनिता मुचाटे, बालाजी शेळके, उपमुख्याध्यापक अनिल सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, आपल्याकडील तरूण जगभरामध्ये हुशार आहेत. परंंतु सुशिक्षित बेकार युवकांची संख्याही मोठी आहे. याचे कारण म्हणजे आपल्याकडील शिक्षणपध्दती व बाहेर देशातील शिक्षण पद्धती यामध्ये फरक आहे. बर्याचशा देशामध्ये एकाच वेळी अनेक शिक्षणक्रम पूर्ण करता येतात. व त्या शिक्षणाला प्रात्याक्षिकाची जोड आहे. त्यामुळे तेथील तरूण युवकांना तात्काळ नोकरी मिळते. परंतु आपल्या येथील विद्यार्थी मात्र, हुशार असूनही प्रात्याक्षिकाची जोड नसल्यामुळे मागे राहतात. हे वास्तव आहे. शिक्षणाबरोबर मुलांना संस्कारही मिळणे महत्त्वाचे आहे. एखादा मुलगा डॉक्टर, इंजिनियर नाही झाला तरी चालेल परंतु त्याने मानवतेच्या दृष्टिने वाटचाल करावी, असे मतही त्यांनी यावेळी बोलाताना व्यक्त केले. प्रारंभी जेएसपीएम लातूर द्वारा संचलित महाराष्ट्र विद्यालय मजगे नगर येथील एन.एम.एम.एस.परीक्षेतील मयुरी चुनचुने, वैष्णवी इर्ले, समर्थ बिराजदार, व्यंकटेश काळे, अंजली पेठकर, पवन भातणासे, कृष्णा येदाले, सोमेश्वर पाटील, ओमकार अडागळे, कोमल खंदारे, राम बोयणे, तृप्ती बोयणे आदी 12 विद्यार्थ्यांना जेएसपीएम संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते कोव्हिड -19 च्या नियमांचे पालन करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दुल गालिब शेख यांनी मानले. यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यशाचे श्रेय मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांना जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणारे स्वामी विवेकांनद विद्यालय, स्वामी दयानंद विद्यालय व महाराष्ट्र विद्यालय येथील गुणवंत मुख्याध्यापकांची टीम आम्हाला लाभलेली आहे. त्यांनी स्वतःहुन विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या आष्टी येथील विद्यालयास भेट देवून तेथील गुणवत्ता आत्मसात करून आपल्या संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस.परीक्षेमध्ये यशस्वी केले. हीच परंपरा कायम ठेवत जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणार्या सर्व विद्यार्थ्यांना अशा विविध परीक्षेसाठी प्रोत्साहीत करावे, अशी आमची अपेक्षा आहे. असे मतही जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.