घरकुलाच्या बिलासाठी अभियंत्याने लाचेची मागणी केली !!संतोष बर्गे यांच्या पथका कडून त्याला अटकच झाली !!

0
घरकुलाच्या बिलासाठी अभियंत्याने लाचेची मागणी केली !!संतोष बर्गे यांच्या पथका कडून त्याला अटकच झाली !!

लातूर (ॲड.एल.पी. उगिले)
गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या असलेले अधिकारी देखील गोरगरिबांना लुबाडताना थोडाही विचार करत नाहीत. शासनाच्या वतीने गोरगरिबांना घरकुल मंजूर केले जाते खरे, मात्र घरकुल मंजूर करताना घेतलेली लाच वेगळी, घरकुल पूर्ण केल्यानंतर त्याचे बिल काढण्यासाठी पुन्हा लाचेची मागणी, असे दुष्टचक्र पंचायत समितीच्या घरकुल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सर्रास करत असल्याची ओरड यापूर्वी होतच होती, पंचायत समितीच्या मार्फत ज्या ज्या लोककल्याणकारी योजना आहेत, त्या योजना जणू काही हे अधिकारीच आपल्या पैशातून देतात की काय ? अशा पद्धतीने आपला वाटा ठरवून मगच काम करायचे, असा पायंडाच पडलेला आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी, म्हणून शासनाच्या वतीने जनावरांना निवारा म्हणून गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. तिथे देखील हेच अधिकारी आणि कर्मचारी तिथेही वाटेकरी होतात. काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पंचायत समितीमध्ये विहिरीसाठी तीस ते पस्तीस हजार तर गोठ्यासाठी दहा हजार घरकुलाच्या बिलासाठी टप्प्याटप्प्याने दहा – दहा हजार अशा पद्धतीचे रेट कार्ड ठरलेले आहेत. अशाच एका व्यक्तीला घरकुलाचे बिल काढण्यासाठी पंचायत समितीतील अधिकारी अडवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सरळ अभियंत्याची भेट घेतली, तेव्हा त्यांनी घरकुलाचा तिसरा हप्ता 30 हजार रुपये देण्यासाठी तेरा हजाराची लाच मागितली, त्यानंतर तडजोडी अंती दहा हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली. सदरील रक्कम लाचेची असून लाच देणे योग्य वाटले नाही, म्हणून त्या व्यक्तीने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे आणि त्यांच्या पथकाने याची खातरजमा करण्यासाठी त्याच दिवशी अर्थात 3 जुलै रोजी पंचा समक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, इतर लोकसेवक सचिन बालाजी राठोड (वय 24 वर्ष, पद ग्रामीण गृहनिर्माण अभियंता घरकुल विभाग पंचायत समिती लातूर) यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असलेल्या तिसऱ्या हप्त्याचे 30 हजार रुपये खात्यावर टाकण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष 13 हजार रुपयांची मागणी करून लाच स्वीकारण्याची सहमती दर्शवली. तेव्हा तक्रारदार यांनी लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवल्यानंतर आरोपी सचिन बालाजी राठोड यांनी सदरील रक्कम खाजगी व्यक्ती विकास राम चव्हाण (व 29 वर्ष व्यवसाय शेती राहणार कृष्ण नगर काडगाव, तालुका जिल्हा लातूर )यांच्याकडे देण्यास सांगितले. सदरील रक्कम आरोपी क्रमांक दोन यांना दिल्यानंतर त्यांनी आरोपी क्रमांक एक यांना तक्रारदाराचे बिल टाकायला लावतो असे सांगून दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारून कागदामध्ये गुंडाळून ती रक्कम आरोपी क्रमांक एक यांच्याकडे दिली. त्यावेळेस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्या दोन्ही आरोपींना रंगे हात पकडून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7, 12 अन्वये शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरील कारवाई ही नांदेड परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे, पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, पोलीस हवालदार फारूक दामटे, भागवत कठारे ,भीमराव आलुरे , शाम गिरी, पोका मंगेश कोंडरे, दीपक कलवले, गजानन जाधव, किरण गंभीरे, शहाजान पठाण, शिवराज गायकवाड, परविन तांबोळी, संतोष क्षीरसागर यांच्या पथकाने यशस्वी केली.
महसूल विभागामध्ये मोठ्या प्रमाणात लाचेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लूट चालू आहे. शासन देते मात्र हे अधिकारी झारीतले शुक्राचार्य बनून “धर्मादारी कुत्रा आडवा” म्हणतात, तशा पद्धतीने या लोककल्याणकारी योजनांचे लचके तोडले जात आहेत. त्यामुळे कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम शासनाने ठरवून दिलेल्या निर्धारित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त पैसे मागत असतील तर बिनधास्तपणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल. असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!