शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उत्कृष्ट कामगिरी !!
अवैध धंदेवाल्याची बंद होणार आता दादागिरी !!
उदगीर (ॲड. एल पी उगीले) उदगीर शहरात लपून छपून मात्र मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात असल्याची ओरड होत होती. याच दरम्यान नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध हातभट्टी आणि अवैध देशी दारू विक्री बंदीच्या दृष्टीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. एकंदरीत नांदेड परिक्षेत्रामध्ये अवैध धंद्याला आळा घातला पाहिजे, या दृष्टीने त्यांचे विशेष प्रयत्न चालू आहेत.
याच काळात लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाला अमोल तांबे यांच्या रूपाने नवीन कॅप्टन मिळाल्यामुळे उत्साहाने पोलीस प्रशासन अवैध धंद्याच्या विरोधामध्ये दंड थोपटून उभा राहिले आहेत. उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी वरिष्ठांच्या या सूचनांचे तंतोतंत पालन करत, आपल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पो.ना.गजानन पुल्लेवाड, सतीश पवार, संदीप साठे, दीपक कच्छवे, योगेश फुले, बजरंग गजलवार यांच्या पथकाला विशेष सूचना देऊन अवैध धंद्याला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा सल्ला दिला.
या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पहिल्या टप्प्यात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा इत्यादी परराज्यातून येणारा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू चोरट्या पद्धतीने साठवून पान टपऱ्यावर विक्री करणे किंवा साठवून ठेवण्याच्या उद्देशाने जमा केलेल्या गोडाऊन वर धाडी टाकून मोठी कारवाई केली होती. त्या पाठोपाठ आता सामाजिक जाणीवा जपत अवैध दारू विक्रीवर या पथकाची नजर असून उदगीर शहरालगत असलेल्या फुलेनगर भागातील खेर्डेकर निवास यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस रिकाम्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची विक्री होते. अशा पद्धतीची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती. सदरील प्राप्त झालेल्या माहितीची शहानिशा करून या पथकाने सहा जुलै 2025 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गस्त घालण्याच्या निमित्ताने जाऊन त्या ठिकाणावरून खाकी खाकी बॉक्समध्ये देशी दारू भिंगरी संत्रा असे कागदी लेबल असलेल्या काचेच्या 180ml च्या सीलबंद 336 बाटल्या प्रति बॉटल किंमत 70 प्रमाणे एकूण 23 हजार 520 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फुलेनगर येथून नितीन प्रभाकर खर्डेकर याच्या ताब्यातून विना पास परवाना देशी दारूचे सात खाकी कपटी बॉक्स यामध्ये 336 बॉटल्स किंमत अंदाजे 23 हजार 520 रुपयांचा प्रोबीशनच्या गुन्ह्याचा माल विक्री व्यवसाय करताना बेकायदेशीर रित्या जवळ बाळगलेला मिळून आला. वगैरे आशयाची फिर्याद पोलीस नायक गजानन मारुती पुल्लेवाड यांनी दिल्यावरून, उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे आरोपी नितीन प्रभाकर खेर्डेकर याच्याविरुद्ध गु.र.न. 232/ 25 कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील प्रकरणी उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका विनायक कांबळे हे करत आहेत.
उदगीर शहरातील अवैध दारू विक्रीमुळे कष्टकरी, मजूर यांना गल्लोगल्ली मिळत होती. मात्र कित्येक वेळा असा माल बनावट आणि तळीरामाच्या आरोग्यासाठी घातक असू शकतो. मात्र त्याची कोणीही शहानिशा न करता सहज उपलब्ध होतो, म्हणून मिळेल ती देशी दारू घेऊन नशापान करून हे कष्टकरी लोक विश्रांती करतात. मात्र ती नशा त्यांच्यासाठी किती घातक आहे. हे त्यांना लक्षात येत नाही. कित्येक वेळा तर उदगीर मध्ये बनावट देशी दारू विक्री करणारे रॅकेटही पकडले गेले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अवैध दारू विक्री ही तळीरामाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. याचेही गांभीर्य पोलिसांनी विचारात घेऊन कारवाई केली आहे. उदगीर शहर पोलिसांनी मोठी कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
