डॉ. अनिल भिकाने यांचे सेवा कार्य लाखमोलाचे- आ . संजय बनसोडे*
उदगीर(एल पी उगीले) डॉ. अनिल भिकाने यांनी आपल्या क्षेत्रात केलेले कार्य सेवा म्हणून केलेले आहे.सेवेचे कार्य नेहमीच अतुलनीय असते. असे प्रतिपादन माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केले .नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे होते. मंचावर सत्कारमूर्ती डॉ. अनिल भिकाने, सौ. अरुणाताई भिकाने,माजी आ. प्रा. मनोहर पटवारी , माजी आ. गोविंदराव केंद्रे, स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी- विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, प्राचार्य डॉ. बाबुराव लहाने, देविदास नादरगे, विश्वनाथ बिरादार, दशरथ शिंदे, प्रा एस एस पाटील उपस्थित होते .
डॉ. अनिल भिकाने यांनी नेमून दिलेले काम सचोटीने करतानाच पशुधन,पशुवैद्यक महाविद्यालय व त्या संदर्भाने लागणाऱ्या सर्व बाबींसाठी मनापासून प्रयत्न केले.त्यांचे वर्तन आणि नम्रता हे गुण कौतुकास्पद असून त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन या क्षेत्रात उदगीर मध्ये जे जे करता येईल, ते करण्यासाठी आपण प्रयत्न करू. असे मत आ. बनसोडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .
जिव्हाळा ग्रुप, ज्येष्ठ नागरिक संघ, मराठवाडा जनता विकास परिषद ,अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासह विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या नागरी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.डॉ. भिकाने यांनी पशुवैद्यकीय क्षेत्रासह विविध सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य गौरवास्पद असून त्यांनी आपल्या कार्याची छाप महाराष्ट्रभर उठवली असल्याचे मत आ. बनसोडे यांनी पुढे बोलताना व्यक्त केले.गौरव समितीच्या वतीने डॉ. भिकाने व अरुणा भिकाने यांचा मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.यावेळी बोलताना माजी आ. गोविंदराव केंद्रे यांनी भिकाने परिवारात असलेल्या सामाजिक जाणीवांचा गौरव करत डॉ भिकाने यांच्यामुळे या परिसरात पशुपालकांना मोठा आधार मिळाल्याचे सांगितले. त्यांनी कित्येक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उद्योगाची प्रगती या भागात केली. एका अर्थाने शेतकऱ्याला आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग डॉ. भिकाने यांच्यामुळे प्राप्त झाला.
प्रामाणिकपणे सेवा करणारी मानसिकता दुर्मिळ होत असताना डॉ. भिकाने यांच्यासारखी माणसे निश्चितच कौतुकास पात्र आहेत. असे मत माजी आ. मनोहर पटवारी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले . धनंजय गुडसूरकर लिखित मानपत्राचे वाचन रमाकांत बनशेळकीकर यांनी केले. विवेक होळसंबरे, प्रा. श्रीराम चामले, सौ अरुणा भिकाने यांनी मनोगत व्यक्त केले .
सत्काराला उत्तर देताना डॉ.अनिल भिकाने यांनी पशुपालक हा आपल्यासाठी कायम वंदनीय राहिल्याचे सांगितले .पशुधन हेच दैवत समजून आयुष्यभर काम करताना पशुपालकांशी जोडून राहिलेली नाते ही आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असल्याचे मत डॉ भिकाने यांनी व्यक्त केले .
अनिता येलमटे यांनी सूत्रसंचालन तर दशरथ शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैष्णवी एंटरप्रायेजेस चे विक्रम मुडपे, शुभांगी मुडपे,पांडुरंग बोडके, व्यंकटेश पेद्दावाड, किरण दंडिमे , भरत नादरगे, अनुराग भिकाने,धीरज दंडिमे, आदीनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठया संख्येने उदगीरकर उपस्थित होते.
