लातूरच्या रॉयल एनफिल्ड शोरूमकडून ग्राहकाची फसवणूक; नवीन मॉडेलचे पैसे घेऊन दिले जुनेच मॉडेल

0
लातूरच्या रॉयल एनफिल्ड शोरूमकडून ग्राहकाची फसवणूक; नवीन मॉडेलचे पैसे घेऊन दिले जुनेच मॉडेल

ग्राहकाने डिलर व कंपनीविरोधात ग्राहक मंचाकडे केली तक्रार दाखल

लातूर ः येथील प्रिशा मोटर्स व रॉयल एनफिल्ड कंपनी लि. ने लातूर येथील एका ग्राहकाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. रॉयल एनफिल्ड कंपनीची ‘हंटर ३५० डॅपर ग्रे’ या बुलेटचे पैसे भरून घेऊन जुने मॉडेल ग्राहकाच्या माथी मारल्यामुळे ग्राहकाने आता लातूरच्या ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे. तशी रितसर नोटीसही ग्राहकाने लातूर येथील डिलर व कंपनीला पाठविली आहे.
लातूर येथील ऋत्विक महेश पाटील हे व्यवसायाने इंजिनिअर आहेत. नोकरीनिमित्त सध्या ते बंगळुरू येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी लातूर येथील अधिकृत डिलरच्या माध्यमातून रॉयल एनफिल्ड कंपनीची ‘हंटर ३५० डॅपर ग्रे’ बुलेट खरेदीसाठी कोटेशन घेतले होते. या कोटेशननुसार त्यांनी ‘हंटर ३५० डॅपर ग्रे’ हे माॅडेल खरेदी करण्याचे निश्चित करून ॲडव्हान्स म्हणून दि. १९ मे २०२५ रोजी ५ हजार रुपये भरले. त्यानुसार प्रिशा मोटर्स यांच्याकडून १० दिवसांत बुक केलेली गाडी मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. या नंतरच्या काळात प्रिशा मोटर्स यांच्या सांगण्यानुसार २५ मे रोजी ५० हजार व ४० हजार असे एकूण ९० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने जमा केले तसेच दि. २८ मे २०५ रोजी ५५ हजार व ४० हजार असे एकूण ९५ हजार रुपये ऑनलाईनद्वारे प्रिशा मोटर्सकडे जमा करण्यात आले. त्यानंतर २९ मे २०२५ रोजी ३५ हजार रुपये जमा करून बाईक रजिस्टर करायला चॉइस नंबर पावती देण्यास सांगितले परंतु पूर्ण पैसे भरल्यानंतरच आरटीओ पासींग होईल असे सांगितल्यामुळे दि. ३० मे २०२५ रोजी १७ हजार ४६५ रुपये असे एकूण २ लाख ४२ हजार ४६५ रुपये ऋत्विक पाटील यांनी प्रिशा मोटर्स या बुलेट शोरूममध्ये जमा केले आहेत.
ही रक्कम जमा केल्यानंतर प्रिशा मोटर्सने ऋत्विक पाटील यांना २ जून २०२५ रोजी ‘हंटर ३५० डॅपर ग्रे’ या मॉडेलची गाडी देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार ‘हंटर ३५० डॅपर ग्रे’ बुलेटचे नवीन मॉडेल घेण्यासाठी प्रिशा मोटर्स शोरूममध्ये गेले असता त्यांनी ऋत्विक पाटील यांना फसविण्याच्या उद्देशाने ‘हंटर ३५० डॅपर ग्रे’ ऐवजी ‘हंटर ३५० बुलेट’ हे मॉडेल दिले.
प्रिशा मोटर्सने आपणास जुने मॉडेल दिल्याचे ऋत्विक पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सदरची बुलेट घेऊन प्रिशा मोटर्स यांच्याकडे गेले असता उडवाउडवीची उत्तरे देत ऋत्विक पाटील यांना अरेरावीची भाषा वापरुन ‘‘तुम्हाला काय करायचे ते करा, तुम्हाला काय केसेस करायचे आहेत ते करा आम्ही तुम्हाला सदरची गाडी बदलून देऊ शकत नाही.’’ असे सांगितले.
प्रिशा मोटर्स यांनी दिलेले कोटेशन व इतर जिल्ह्यातील याच कंपनीच्या ‘हंटर ३५० डॅपर ग्रे’ या गाडीच्या कोटेशनमध्ये २० हजार रुपयांपेक्षा अधिकचा फरक दिसून आला. म्हणजे प्रिशा मोटर्सने लातूरमध्ये जे कोटेशन दिलेले आहे त्यानुसार ते ग्राहकांना लुटण्याचे काम करत असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे ऋत्विक पाटील यांना लक्षात येताच त्यांनी लातूर येथील डिलर प्रिशा मोटर्स व रॉयल एनफिल्ड कंपनी लिमिटेड या दोघांनाही रितसर नोटीस पाठवून ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली आहे.
हंटर ३५० डॅपर ग्रे या नवीन मॉडेलच्या गाडीची किंमत घेऊनसुद्धा जाणूनबुजुन फसवण्याच्या उद्देशाने जुन्या मॉडेलची गाडी दिली व जाणूनबुजून फसवणूक करून सेवेमध्ये त्रुटी दिल्या. तसेच ही सर्व घटना कंपनीस कळवूनही जुन्या मॉडलची ‘हंटर ३५० डॅपर ग्रे’ ही गाडी बदलून नव्या मॉडेलची गाडी अद्यापपर्यंत दिलेला नाही. त्यामुळे जो आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे त्या त्रासापोटी रक्कम रुपये दोन लाख रुपये दंड म्हणून ही नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत द्यावेत, अशा मागणीची नोटीस श्री. पाटील यांनी प्रिशा मोटर्स व रॉयल एनफिल्ड कंपनी लि. यांना दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!