मागील दोन वर्षापासून प्रलंबित असलेली कंत्राटदाराची देयके अदा करा

अन्यथा आमरण उपोषण; लातूर जिल्हा बिल्डर असोसिएशन अॅफ इंडिया चा इशारा
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा विभाग, जलसंधारण विभाग व इतर विभागातील असंख्य कामे कंत्राटदारानी पूर्ण केलेली आहेत व असंख्य कामे प्रगतीपथावर आहेत. परंतु मागील दोन वर्षापासून सदरील कामाची देयके मिळाली नाहीत. बँकांचे व्याज, हप्ते, मजुरांची पेमेंट, तसेच बाजारातील उसनवारीवर केलेले व्यवहार पूर्ण होत नसल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडलेला असून त्याच्यात आर्थिक अडचणीमुळे नैराश्या येत आहे. मागील महिन्यात सांगली जिल्ह्यातील युवा कंत्राटदार कै. हर्षल पाटील यांनी प्रलंबित देयके न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातसुद्धा कंत्राटदार आर्थिक अडचणीत आल्यामुळे तशी पुनरावर्ती होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र ग्रामीन रस्ते विकास संस्था, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद विभाग, पाणी पुरवठा विभाग, जलसंधारण विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, जलजीवन मिशन, महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद व इतर विभागातील कंत्राटदारांची हजारो कोटींची देयके मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही संपूर्ण देयके 8 ऑगस्ट 2025 पर्यन्त अदा करण्यात यावीत. अन्यथा क्रांतिदिन दि 9 ऑगस्ट 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय लातूर समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा लातूर जिल्हा बिल्डर असोसिएशन अॅफ इंडिया च्या वतीने देण्यात आला आहे.
