रामघाट तांडा रस्त्याने चौर्याहत्तर वर्षानी घेतला मोकळा श्वास
उपविभागीय अधीकारी, तहसीलदार यांची मध्यस्थी
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील रामघाट तांडा या गावचा रस्ता काही कारणाने अडकून पडला होता. त्यामुळे 74 वर्षांनी स्वतंत्र गायमाळ तांडा ते रामघाट तांडा रस्ता उदगीर चे उपविभागीय अधिकारी प्रवीणजी मेंगशेट्टी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मध्यस्थीने वाद संपुष्टात आला आहे. राज्याचे राज्यमंत्री ना.संजयभाऊ बनसोडे यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे. सदरील रस्त्याबाबत मागील बऱ्याच दिवसापासून आंदोलने, उपोषण करण्यात येत होते.या गावातील नागरिकांना एखादी व्यक्ती अजारी पडली तर चारपायीचा आधार घ्यावा लागत असे. दळणवळण, वाहतूक व आरोग्यविषयक असेल अशा विविध कारणासाठी रस्त्या अभावी अनेक अडचणींना सामना येथील नागरीकांना करावा लागत होता.
या बाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने सदर रस्ता जवळपास चार किलोमीटर लांबीचा असून तो आज खुला करण्यात आला आहे.या रस्ताचे मजबुतीकरण व खोदकाम पूर्ण झाल्याने रामघाट तांडा गावातील नागरिक ही आनंदी झाले आहेत. या ठिकाणी गावचे अॅड शिवाजी राठोड,तानाजी राठोड,श्याम गुरुजी,मंडळाधिकारी गणेश हिवरे, तलाठी किशोर पाटील,व तांडा येथील नागरीक उपस्थित होते.