अहमदपूर शहरात शाळा-महाविद्यालयीन परिसरात टवाळखोरांचा धुमाकूळ
अहमदपूर ( गोविंद काळे): अहमदपूर शहरातील महात्मा फुले विद्यालय आणि इतर शाळा-महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना ‘रोड रोमिओ’ आणि गावगुंडांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महात्मा फुले हौसिंग सोसायटी आणि रूक्मे नगर येथील रहिवाशांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे (एसडीपीओ) याबाबत लेखी तक्रार केली आहे.
या तक्रारीनुसार, शाळेच्या वेळेपूर्वी, मध्यंतरात आणि शाळा सुटल्यानंतर हे टवाळखोर सक्रिय असतात. तसेच, रात्रीच्या वेळी खाजगी शिकवणी वर्गांच्या परिसरातही त्यांचा उपद्रव वाढला आहे. यात मुलींची छेडछाड करणे, त्यांचा पाठलाग करणे, कट मारणे, टोमणे मारणे, तसेच जोरजोरात हॉर्न वाजवून दहशत निर्माण करणे अशा कृत्यांचा समावेश आहे. विशेषतः लहान मुलांना धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेण्याचे प्रकारही नित्याचे झाले आहेत.
या त्रासामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भयभीत झाले आहेत. भीतीपोटी ते ही बाब आपल्या पालकांना किंवा शिक्षकांना सांगण्यासही कचरत आहेत. नागरिकांनी या टवाळखोरांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट त्यांच्यावरच धावून जातात, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या रोड रोमिओमध्ये शहरातील काही सराईत गुन्हेगार देखील सामील असल्याचे रहिवाशांनी पत्रात नमूद केले आहे.
या वाढत्या गुंडगिरीमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. रहिवाशांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच, शाळा-महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांची भीती दूर करावी आणि या गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. पोलिसांनी यावर तात्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवेदनावर अभिजीत माने, संतोष डुबेवार ,रामेश्वर पुणे, शांता मुंडे, राजकुमार पाटील, शिंदे रंगनाथ, ज्ञानोबा डुरे, शिंदे सुधाकर, पंडित मुंडे, श्याम नाकसाखरे, सांगळे संभाजी, भिंगोले ओमप्रकाश, अभिषेक चिद्रेवार, सदाशिव कराड, माने दिलीप, दुधाटे संजय, प्रा. संतोष मुळे, दत्ता गोरे ,गोपाळ परचंडे, किरण माने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
