बी-झोन क्रॉस कंट्री स्पर्धेत महात्मा गांधी महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश
अहमदपूर( गोविंद काळे): अहमदपूर येथील विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बी-झोन क्रॉस कंट्री स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी प्रथम, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा गौरव वाढवला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महाराष्ट्र-उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथे ५ ऑगस्ट २०२५ रोजी क्रॉस कंट्री (१० किमी धावणे) बी-झोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महात्मा गांधी महाविद्यालयाचा खेळाडू विठ्ठल राठोड याने प्रथम क्रमांक पटकावला, तर संविधान ढवळे याने तृतीय क्रमांक मिळवला. याव्यतिरिक्त, इम्रान तांबोळी याला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
या तिन्ही यशस्वी खेळाडूंची आता विद्यापीठाच्या इंटर-झोन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. किशनराव बेंडकुळे, सहसचिव सुरेशराव देशमुख, प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, क्रीडा विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ. विनोद माने यांनी खेळाडूंचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. खेळाडूंच्या या यशाने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
