जन्म देणाऱ्या आईचा खून करून मृतदेह शेतात पुरला, मुलानंही घेतला गळफास
लातूर (प्रतिनिधी) मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला पुंजलेले आहे, असे म्हटले जाते. तशाच पद्धतीने एका आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याने मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्याचा सल्ला आपल्या आईला दिला. मात्र शेती विकली तर काय खाणार? या भावनेने आईने शेती विकायला नकार दिला, नुसता नकारच नाही तर स्पष्टपणे विरोध केला.
आपण आपले कर्ज फेडू शकत नाही, आणि कर्ज फेडल्याशिवाय समाजामध्ये सन्मानाने जगता येणार नाही. अशा विचाराने त्या शेतकऱ्याने आईचा खून केला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे समोर आली आहे. आईचा खून करणाऱ्या मयत मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असे असले तरीही आपल्या आईच्या खुनामध्ये भावा शिवाय इतर अनेकांचा सहभाग असल्याचा संशय मृत महिलेच्या मुलीने केला आहे.
रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील काकासाहेब वेणूनाथ जाधव यांनी रेणापूर-पिंपळफाटा येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याच दरम्यान मयताच्या आईचाही मृतदेह शेतात आढळून आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर घटनेची माहिती मयताचा मेहुणा विनायक कोंडीराम जगदाळेयांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. या संदर्भात रेनापुर पोलीस अधिक तपास करत आहेत.
