महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघ सदैव अग्रेसर राहणार – चेअरमन भरत चामले

0
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघ सदैव अग्रेसर राहणार - चेअरमन भरत चामले

उदगीर (ॲड. एल पी उगिले) स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ हा शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी सदैव अग्रेसर आहे. गेल्या काही महिन्यापासून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महिला बचत गटांच्या मार्फत छोटे छोटे उद्योग सुरू करता येतात का? या संदर्भात विचार करून महिलांच्या हाताला काम देऊन आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या वतीने प्रयत्न चालू असल्याचे विचार चेअरमन भरत भाऊ चामले यांनी जाहीर केले. ते नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या माध्यमातून आता उदगीर तालुक्यात नॅचरल चहापत्ती विक्रीस सुरुवात होणार आहे. स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पुढाकाराने महिला बचत गटांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने आयोजित महिला बचत गटाच्या मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
खरेदी विक्री संघाच्या या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे नवे दालन खुले होणार असून, स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण उत्पादन सहज उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नुकताच महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात चहापत्तीची गुणवत्ता, बाजारभाव, विक्री पद्धती, ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचविण्याच्या तंत्रांसह विक्रीतील कौशल्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महिलांना मार्गदर्शन करताना स्वावलंबन,आत्मविश्वास आणि आर्थिक सक्षमीकरणाचा संदेशही देण्यात आला.
नाफेडची नॅचरल चहा पत्ती ही आसाम प्रदेशातील उत्कृष्ट दर्जाचा चहा वापरून तयार करण्यात आली आहे. तिचा स्वाद, रंग व सुवास या गुणधर्मांमुळे ग्राहकांना ती आधीपासूनच पसंत पडत आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या या चहामुळे ग्राहकांना योग्य दरात,शुद्ध आणि उच्च प्रतीचे उत्पादन मिळणार आहे.अधिकृत विक्रेते म्हणून स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी-विक्री संघ, मार्केट यार्ड, उदगीर यांनी विक्रीची जबाबदारी स्वीकारली आहे.मेळावा प्रसंगी पुढे बोलताना चेअरमन भरतभाऊ चामले म्हणाले की, “हा उपक्रम केवळ उत्पादन विक्रीपुरता मर्यादित नसून, तो ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे एक साधन ठरणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा नवा मार्ग खुला होईल. असा मला ठाम विश्वास आहे.”
मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलराव मुळे, बाबासाहेब काळे, प्रभाकर पाटील, झुंजार पाटील, दिनेश पाटील, पप्पू गायकवाड, प्रकाश राठोड, मधुकर गुडे, रामकिशन नादरगे, व्यंकटराव पेटे मामा, बबलु घोणशीकर आदी मान्यवर उपस्थित होते. पंचायत समितीचे अधिकारी श्रीमंगले यांनी महिलांना विक्री प्रक्रियेसंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.
सुमारे 200 महिला सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सर्व उपस्थित महिलांना ‘नॅचरल चहापत्ती’ चे सॅम्पल पॅकेट मोफत वाटप करण्यात आले. काही महिलांनी तर तत्काळ विक्री सुरू करण्याची तयारी दर्शवली. लवकरच प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्र आणि विक्री योजनेची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाकडून देण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब नवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाबासाहेब काळे पाटील यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!