लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात रविवारी ‘लातूर हरितोत्सव’, वृक्षारोपणासाठी रोपे, साहित्य एकाच ठिकाणी होणार उपलब्ध
लातूर (प्रतिनिधी) राज्यात सर्वात कमी वृक्षाच्छादन असलेल्या जिल्ह्यांमध्ये लातूरचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी ‘माझं लातूर, हरीत लातूर’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत यंदा सलग दुसऱ्या वर्षी लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात रविवार, १७ ऑगस्ट रोजी ‘लातूर हरितोत्सव’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यानिमित्ताने महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई दरम्यान वृक्ष दिंडीचे आयोजन होईल. या उपक्रमात जिल्हा प्रशासनासह वृक्षप्रेमी संघटना आणि लातूर व्यापारी महासंघ सहभागी होणार आहे.‘लातूर हरितोत्सव’दरम्यान गंजगोलाई ते हनुमान मंदिर चौक परिसरात खासगी रोपवाटिकांचे स्टॉल्स लावले जातील. यामध्ये औषधी वनस्पती, शोभिवंत झाडे, परसबागेसाठी योग्य रोपे, फळझाडे, फुलझाडे, सेंद्रिय खते, कुंड्या आणि इतर आवश्यक साहित्य सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. शहरातील नागरिकांना घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये लावण्यायोग्य झाडांची माहिती दिली जाईल. तसेच, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर लावण्यासाठी योग्य फळझाडांच्या निवडीपासून लागवडीपर्यंत मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय, महिला बचत गटांचे खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्सही उभारले जातील.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खासगी रोपवाटिकाधारकांनी वृक्ष प्रदर्शन आणि विक्री स्टॉल्सच्या नोंदणीसाठी लातूर कृषी विभागातील योगेश स्वामी (भ्रमणध्वनी क्र. ८४२१५०२९११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
