महिला सक्षमीकरणाची गती वाढणे गरजेचे – प्रा.डॉ. उषा धसवाडीकर
उदगीर (प्रतिनिधी) समाजाच्या जडणघडणीत महिलांचा सिंहाचा वाटा आहे.आज सर्व क्षेत्रात स्त्री आपापल्या पद्धतीने प्रभावीपणे काम करीत आहे. महिला सक्षमीकरणाची गती वाढणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. उषा धसवाडीकर यांनी केले.
उदगीर येथे धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या ८६ वा स्मृतीप्रित्यर्थ ९१ व्या वचन सप्ताहात श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या डॉ. उषा धसवाडीकर या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील प्र.प्राचार्य डॉ. ए.ए. काळगापुरे होते. महात्मा बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना प्रा.डॉ. धसवाडीकर म्हणाल्या, देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-पुरुष दोघेही महत्त्वाचे असून स्त्रियांना सोबत घेऊनच प्रगती साधता येईल. राजकारणात महिलांचा सहभाग कमी असून तो वाढला पाहिजे. मानसिक आरोग्यावर शारीरिक आरोग्य अवलंबून असून महिला या शारीरिक दृष्टीने पुरुषांपेक्षा कमी, मात्र बुध्यांकात अव्वल आहेत. महिला सबलीकरणावर आजही जागोजागी महिलांना बोलावे लागते, हे सुद्धा एका अर्थाने आपल्या सामाजिक विषमतेचे लक्षण आहे. स्त्री पुरुष समानतेची सनद भारतीय राज्यघटनेने महिलांना दिलेली आहे. त्याची जाणीव सगळ्यांनी ठेवायला हवी. महिला सक्षमी व सबलीकरणाचे अनेक फायदे असून आज २१ व्या शतकातही त्याची गती कमी असून गती वाढणे गरजेचे आहे, त्यासाठी समाजातील सर्व घटकांची साथ महत्वाची आहे.
अध्यक्षीय समारोपात प्र.प्राचार्य डॉ. ए.ए. काळगापुरे म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी प्रतिकूल परिस्थितीत क्रांतिकारी कार्य केले. त्यांच्याच पावलावर पाऊल पाऊल ठेवून मुक्तिसंग्रामात धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांनी सामाजिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावली. महात्मा बसवेश्वर यांचे विचार हे विश्वव्यापक होते.१२ व्या शतकात समाजातील असमानता दूर करण्याचे कार्य त्यांनी केले. कार्यक्रमास बंधू व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र हसरगुंडे यांनी केले. सुत्रसंचालन उत्तरा कलबुर्गे यांनी तर आभार ओमप्रकाश स्वामी यांनी मानले.
