‘विभाजन विभिषिका’ या दिवसाची आठवण करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य: डॉ. बालाजी कारामुंगीकर
अहमदपूर ( गोविंद काळे ) भारताच्या अखंडतेसाठी ‘विभाजन विभिषिका’ या दिवसाची आठवण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. बालाजी गोविंदराव कारामुंगीकर यांनी केले. अहमदपूर येथील राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित ‘विभाजन विभिषिका एक अविस्मरणीय दिवस’ या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
प्राचार्य शिवाजी कवलेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर आयएमसी मेंबर महेश महाजन, सुमित बिलापट्टे, गट निदेशक सुरवसे टी.जी. आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. कारामुंगीकर यांनी सांगितले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी, त्या स्वातंत्र्याची पहाट रक्ताच्या आणि अश्रूंच्या सागरात न्हाली होती. इंग्रजांनी अवलंबलेल्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीमुळे हिंदू-मुस्लिम समाजात फूट पडली. धार्मिक राजकारण, 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना, दोन राष्ट्रांचा सिद्धांत, 1940 मधील लाहोर ठराव आणि नेतृत्वातील मतभेद ही विभाजनाची प्रमुख कारणे होती.
या विभाजनामुळे सुमारे 1 कोटींपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आणि 10 ते 15 लाख लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हजारो महिलांवर अत्याचार, बलात्कार झाले आणि लाखो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. शतकानुशतके एकत्र राहिलेले हिंदू, मुस्लिम आणि शीख समाज एकमेकांचे शत्रू बनले. रेल्वेगाड्या मृतदेहांनी भरून येत होत्या. गावागावांत शत्रुत्व आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
डॉ. कारामुंगीकर यांनी तरुण पिढीला आवाहन केले की, हा भीषण इतिहास लक्षात ठेवून सौहार्द, एकता आणि सामंजस्य राखणे हीच त्या लाखो बळींना खरी श्रद्धांजली ठरेल. विभाजन हा केवळ राजकीय निर्णय नसून ती एक मानवी शोकांतिका होती.
भविष्यात अशा प्रकारची दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्व भारतीयांनी या दिवसाची आठवण ठेवली पाहिजे, असे त्यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय समारोप प्राचार्य शिवाजी कवलेकर यांनी केले. महेश महाजन यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राका सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरवसे टी.जी. यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कौशल्य रोजगार व नाविन्यता विभाग मंत्री ॲड. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेली 32 मिनिटांची व्हिडिओ क्लिप दाखवून करण्यात आली.
