अहमदपूरच्या स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळास तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार
अहमदपूर ( गोविंद काळे): अहमदपूर नगरपरिषदेने आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०२४ मध्ये स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाने तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार पटकावला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्री. संतोष लोमटे आणि प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी मा. मंजुषा लटपटे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. स्वराज्य मंडळास सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि १५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत बाल सार्वजनिक गणेश मंडळाने द्वितीय, तर लोकमान्य गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.
स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाने गणेशोत्सवादरम्यान नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या सर्व पर्यावरणपूरक नियमांचे पालन केले होते.
यावेळी स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मजगे, अध्यक्ष मारुती हेमनर, उपाध्यक्ष राजू जाधव, सचिव महेश जाधव यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि नगरपरिषद कार्यालयातील कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.
