११४१ फुटी तिरंगा रॅलीने अहमदपूर दुमदुमले
अहमदपूर ( गोविंद काळे ) स्वातंत्र्यदिनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत शहरात ११४१ फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची भव्य रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की जय’ आणि ‘भारतीय तिरंगा ध्वजाचा विजय असो’ अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते फीत कापून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
माजी आमदार बब्रुवान खंदाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर विचार विकास मंडळाचे संचालक देशमुख सर, उपविभागीय पोलीस अधिकारी भातलवंडे सर, महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवार सर, प्रा. जुगल किशोर शर्मा, ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे, माजी अध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच तक्षशिला बुद्ध विहाराचे भंते महाविरो थेरो, किशन महाराज परचंडेकर आणि शाही इमाम मौलाना जागीरदार यांची उपस्थिती राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरली.
महात्मा गांधी महाविद्यालयापासून सुरू झालेली ही रॅली शहरातील मेन रोड, आझाद चौक, हनुमान मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राष्ट्रगीताने संपन्न झाली. या रॅलीत विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीची काही क्षणचित्रे : –
मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी तिरंगा रॅलीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली.
एनसीसी, एनएसएस आणि इतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
रॅलीत देशभक्तीपर गीते आणि महापुरुषांच्या घोषणांनी वातावरण भारले होते.
रथात विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते, ज्यामुळे सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला.
अधूनमधून पावसाच्या सरी येत असतानाही विद्यार्थ्यांचा उत्साह कायम होता, हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
रॅलीतील विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रपुरुषांचे फोटो लक्षवेधी ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले, तर अध्यक्षीय समारोप माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केला. आभार प्रदर्शन आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे यांनी केले.
