जरांगे पाटलांचे अहमदपूरला आवाहन ; मुंबईला या, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही!
अहमदपूर ( गोविंद काळे ) मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी १४ ऑगस्ट रोजी अहमदपूर येथे भेट देऊन समाजाला मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत धडकण्याचा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.अहमदपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या धावत्या दौऱ्यात जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ‘एक मराठा लाख मराठा, आता कुठं जायचं, मुंबईला जायचं’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली असतानाही, जरांगे पाटील यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. एका कार्यकर्त्यांने त्यांना छत्री देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी ती नाकारली. “माझा समाज पावसात भिजत असताना मी छत्री घेणार नाही,” असे म्हणत त्यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी दाखवली. धो-धो पावसात भिजत त्यांनी अहमदपूर तालुक्यातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाषणाची सुरुवात केली. सकल मुस्लीम समाजातर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला. “आता आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी आरक्षण हे ओबीसीमधूनच घेणार असल्याचे स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यामुळे अहमदपूरमध्ये मराठा समाजामध्ये एक नवा उत्साह संचारला असून, आगामी मुंबई आंदोलनासाठी मोठी तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
