ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली चालतो जुगाराचा अड्डा !!

0
ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली चालतो जुगाराचा अड्डा !!

एस पी च्या पथकाने फक्त शहरात धाडी टाकून दाखवला नवीन पायंडा ?

उदगीर(प्रतिनिधी) शहर आणि ग्रामीण भागात अवैध धंदे हळूहळू पाय पसरू लागले आहेत. गंमत म्हणजे या धंद्याला चालना देणारे पोलीस प्रशासनातीलच काही लोक असल्याची चर्चा आहे. दररोज पोलिसांच्या मांडीला मांडी लावून बसणारे दलाल हेच आता अवैध धंद्याचे शिलेदार बनू पाहत आहेत. अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. उदगीर शहरात गुटखा, मटका, जुगार हे काही प्रमाणात चालूच होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदे बंद व्हावेत, या उद्देशाने वेळोवेळी सूचना करून देखील थातूर मातुर कारवाया करून पोलीस प्रशासन अवैध धंद्याच्या विरोधात आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र प्रत्यक्षात अवैध धंदे आटोक्यात येण्याऐवजी अवैध धंद्याचे एक एक नवीन प्रकार वाढू लागले आहेत. बाजारच्या दिवशी ऐन बाजारात बॉल गेम च्या नावाने चक्क ग्रामीण जनतेची लूट केली जातेय, झटपट श्रीमंतीच्या नादात शाळा, कॉलेजची मुले देखील अशा पद्धतीच्या जुगाराला भूलू लागले आहेत. हे कमी होते म्हणून की काय? देव जाणे ! आता शहरात आणि ग्रामीण भागात जवळपास 20 ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली चक्क मटक्याच्या बुक्क्या चालू असल्याचे बोलले जात आहे.

या संदर्भात चर्चा सुरू झाल्यानंतर लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लक्ष द्यायला सुरुवात केली. उदगीर शहरातील पत्तेवार चौक, भाजी मार्केट येथील ऑनलाईन लॉटरी सेंटरवर या पथकाने कारवाई केली. त्यात 17 हजार 250 रुपयांचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आले. यासंदर्भात उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गुरन 290 /25 कलम 12 म. जुगार कायदा अन्वये अविनाश लक्ष्‍मणराव वागुवले (वय 33 वर्ष राहणार चांभार सोसायटी उदगीर), सुरेश गोविंदराव वाघमारे (वय 34 वर्ष राहणार सात सैलानी उदगीर), ओमकार लक्ष्मणराव हवा (राहणार उदगीर (फरार)) अशा तिघा आरोपींच्या विरुद्ध लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस हवालदार विष्णुपंत धोंडीराम सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बिग विन नावाचा ऑनलाईन लॉटरी जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने जुगाराचे साहित्य अंदाजे किंमत 17,100 रुपये आणि रोख रक्कम दीडशे रुपये असा एकूण 17250 चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक एक आणि दोन यांनी बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन बिग विन नावाचा ऑनलाईन लॉटरी चा जुगार खेळत व खेळवीत असताना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 17250 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदरील ऑनलाइन लॉटरी जुगार दुकानाचा मालक हा आरोपी क्रमांक तीन असून, त्याच्यासाठी आपण काम करत असल्याचे पहिल्या दोन आरोपींनी सांगितल्यामुळे तिसऱ्या आरोपीच्या विरुद्ध ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक कांबळे हे करत आहेत.
उदगीर शहरातील ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यावर धाडी पडल्या हे ठीक, मात्र ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये चालणाऱ्या एकाही ऑनलाइन लॉटरी सेंटरवर कधीच धाड पडली नाही. खेळाडू बोलतात की, सदरील अवैध पद्धतीने ऑनलाईन लॉटरी चालवणारे हे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांचे निकटवर्ती असल्यामुळे, आणि अनेक प्रकरणांमध्ये दलाली करून त्यांना पैसे मिळवून देणारे दलाल असल्यामुळे त्या अड्ड्यावर अर्थात बुक्क्यावर कोणीही धाड टाकू शकत नाही. खरे खोटे देव जाणे! मात्र या चर्चेमुळे या अवैध धंद्याला पोलिसांचा हात आहे किंवा आशीर्वाद आहे असे म्हणायला भरपूर वाव आहे. अशीही चर्चा आता जोरदार चालू आहे.

चौकट……..
या जुगाराच्या धाडीत केवळ दीडशे रुपये रोख जप्त ?…..

वास्तविक पाहता सतत दुकानात तोबा गर्दी असताना प्रत्यक्ष जेव्हा धाड झाली त्यावेळेस किती खेळाडू उपस्थित होते? त्यांच्याकडून किती रक्कम जप्त करण्यात आली? आणि जर प्रत्यक्ष खेळाडू जर नसतील तर त्या ठिकाणी ऑनलाइन लॉटरी च्या नावाने जुगार चालू होता, किंवा मटका चालू होता. असे म्हणता येईल का? या संदर्भातही उलट सुलट चर्चा सुरू आहे.

चौकट ……..

तो दलाल कोण ?

उदगीर शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये अशा पद्धतीच्या ऑनलाइन लॉटरीच्या नावा आडून चक्क मटका चालवणारा तो दलाल कोण असेल? तो कोणा राजकीय पुढाऱ्याचा कार्यकर्ता किंवा चेला आहे का ? ती केवळ बड्या बड्या बाता मारून आणि गोरगरिबांना लुबाडून पोलिसांच्या तुंबड्या भरणारा भामटा आहे? यासंदर्भात ही चर्चेला आता जोर येऊ लागला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!