संत ज्ञानेश्वर विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलप्रसंगी संस्थेच्या सचिव, प्राचार्या रेखाताई हाके-तरडे आणि उपाध्यक्षा ॲडव्होकेट मानसी हाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कब बुलबुल व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. देशभक्तीपर गीते, कवायत, नृत्य, भाषणे आणि गायन अशा विविध कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.
कार्यक्रमाच्या समारोपात मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये एमटीएस ऑलिंपियाड, गुरुकुल आणि अक्षरगंगा या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर लोकशाही पद्धतीने निवडलेल्या विद्यार्थी संसदेच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
तिरंगा राखी बनवणे, चित्रकला, रांगोळी, आणि भारतीय जवानांना पत्र लेखन यांसारख्या विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांनाही बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
या सोहळ्याला भारतीय जवान शंकर मोरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर, साहित्यिक बालाजी वाघमारे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता आबंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन सतीश साबणे आणि शारदा तिरुके यांनी केले. आभार प्रदर्शन रोकडोबा कुंडगीर यांनी केले.
