महायुती सरकार विरोधात लातूरमध्ये शिवसेनेचे ‘जन आक्रोश’ आंदोलन

0
महायुती सरकार विरोधात लातूरमध्ये शिवसेनेचे 'जन आक्रोश' आंदोलन

​ लातुर ( गोविंद काळे ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात महायुती सरकार विरोधात तीव्र जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी व ग्रामीण जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
​यावेळी शिवसैनिकांनी हातात विविध फलक घेऊन भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या फलकांवर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी केलेल्या कथित गैरव्यवहारांचा निषेध करण्यात आला होता. काही फलकांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून मंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला होता. यात ‘एक मंत्री डान्स बार चालवतो’, ‘दुसरा मंत्री पैशाच्या बॅगाजवळ सिगारेट ओढतो’, आणि ‘तिसरा मंत्री विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी रमी खेळतो’ अशा आशयाचे संदेश होते.
​शिवसैनिकांनी ‘बाजार उठलाय घोटाळ्यांचा, खुर्चीवरून उठवा भ्रष्टाचारांना’, ‘कृषी मंत्री खेळतात रमी कुठे आहे विकासाची हमी’, ‘घरात बॅग पैशांची, सत्ता आहे पन्नास खोक्यांची’ अशा घोषणा देत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील जनता, शेतकरी आणि बेरोजगार त्रस्त असताना मंत्री मात्र आपल्या गैरकृत्यांमध्ये मशगूल आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व प्रकारासमोर हतबल झाले आहेत, असेही फलकांवरून सूचित करण्यात आले.
​या आंदोलनात जिल्हा सहसंपर्कप्रमुख चंद्रनाथ मुरळीकर, नामदेव चाळक, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महानगरप्रमुख सुनील बसपुरे, महिला जिल्हा संघटक जयश्रीताई उटगे, सुनीताताई चाळक, शिवआरोग्य सेनेचे त्र्यंबक स्वामी, युवासेना जिल्हाधिकारी दिनेश जावळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!