मरशिवणी येथे स्वातंत्र्य दिन व अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त वह्या वाटप व वृक्षारोपण
अहमदपूर ( गोविंद काळे) – येथील मरशिवणी गावात स्वातंत्र्य दिन आणि साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
मातंग अस्मिता संघर्ष सेना (मास) आणि शिवसेनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, फळे आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक राठोड के.पी., मातंग अस्मिता संघर्ष सेना (मास) चे मार्गदर्शक मधुकर इबिद्रे, शिवसेना जिल्हा कार्यालय प्रमुख व मासचे तालुका अध्यक्ष सुभाष नागनाथ गुंडीले, मेजर गणपत दोडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मष्णाजी आमुगे, नगरसेवक संजय गुणाले, गुंजरगे रामचंद्र, अतुल हानमंते, सुरेश हाणमंते आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी सहशिक्षिका सांगवीकर के.एम., अंगणवाडी कार्यकर्त्या इंद्राळे कुसुम, शाळा सहाय्यक दोडे गीता, अन्नपूर्णा गुणाले प्रणिता, आणि अंगणवाडी सेविका वाघमारे प्रफुल्ला यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे, मासचे मार्गदर्शक मधुकर इबिद्रे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
