महावितरणचे स्मार्ट मीटर बसवायला येणाऱ्याला हाकलून द्या. हे स्मार्ट मीटर घेणे बंधनकारक नाही– लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे

0
महावितरणचे स्मार्ट मीटर बसवायला येणाऱ्याला हाकलून द्या. हे स्मार्ट मीटर घेणे बंधनकारक नाही-- लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे

लातूर (प्रतिनिधी) घरोघरी आता महावितरण चे स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी हे काम घेतलेल्या एजन्सीचे लोक येऊन जुने मीटर काढून घेऊन नवीन स्मार्ट मीटर बसवत आहेत. हे मीटर बसवून घेणे बंधनकारक नाही, तेव्हा नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास आलेल्या लोकांना चक्क हाकलून द्यावे, आणि मीटर बसवण्यास विरोध करावा. असे आवाहन लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केले आहे.
वीज कायदा २००३ च्या कलम ५५ नुसार स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही, असे लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी सर्व वीज ग्राहकांना कळविले आहे. याची नोंद वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही घ्यावी, असे ही स्पष्टपणे पनाळे यांनी सांगितले आहे.
वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत, ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नये, असे स्पष्टपणे सांगावे. त्यांनी जर हे अमान्य केले तर त्यांना चक्क हाकलून लावावे. कारण, नोडल एजन्सीला हाकलून देणे हे सरकारी कामात अडथळा ठरत नाही, असेही पनाळे यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर या बाबतीत लागू शकत नाही. स्मार्ट मीटर लावायला आलेल्या लोकांना हे मीटर लावणे आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय (परिपत्रक) मागावे. शासनाच्या आदेशाची प्रत त्यांना मागितल्यास ते तुम्हाला देऊच शकत नाहीत, असेही व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे.
हे नवीन स्मार्ट मीटर लावणे सर्वांनी ताबडतोब बंद करावे. कारण, या मीटरच्या वेगवान फिरल्याने वीज बिल भरताभरता ग्राहकांना प्रचंड त्रास होणार आहे. एकदा जर का जुने मीटर काढून हे नवीन स्मार्ट मीटर बसवले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.असे ही लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे.
हे मीटर भविष्यात रिचार्ज सिस्टीमचे होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात सर्वत्र याचा विरोध सुरू असताना आपल्या घरी येऊन जबरदस्तीने मीटर बसविण्याचे काम वीज वितरण कंपनी करीत आहे. जिनियस या कंपनीचे मीटर ज्यांच्या घरी बसविले आहे, त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागले आहेत. याकडेही लोकाधिकार संघाने लक्ष वेधले आहे.भविष्यातील लूटमार थांबविण्यासाठी जनतेने याचा तीव्र विरोध करावा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे नवीन स्मार्ट मीटर बसविणे अनिवार्य नाही. म्हणून हे मीटर आपल्या घरी बसवून घेऊ नका. तसेच या संदर्भातला लोकाधिकार संघाने महावितरणला स्मार्ट मीटर अमान्य म्हणून देण्याकरिता एक अर्जाचा नमुना तयार केला आहे. तो अर्जही ग्राहकाने महावितरणला देऊन त्याची पोहोच घ्यावी, त्यासाठी सर्वांनी सावध राहावे, असे आवाहन लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व जनतेला लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!