राणीसावरगाव येथील विनय शिंदेची एमबीबीएससाठी निवड
राणीसावरगाव ( गोविंद काळे ) राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील प्रतिष्ठित व्यापारी बाळासाहेब शिंदे यांचा मुलगा विनय शिंदे याची शासकीय एमबीबीएससाठी संभाजीनगर येथे निवड झाली आहे. या निवडीमुळे शिंदे कुटुंबावर आणि राणीसावरगावावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विनयने आपले प्राथमिक शिक्षण राणीसावरगावात पूर्ण केले, तर उच्च शिक्षणासाठी त्याने लातूर गाठले. दहावीच्या परीक्षेत त्याने ९६ टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले होते. ग्रामीण भागातून आलेल्या विनयने एमबीबीएससाठी निवड मिळवून, ग्रामीण विद्यार्थी देखील उच्च शिक्षणात मागे नाहीत हे सिद्ध केले आहे. त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
विनयच्या या यशाबद्दल त्याचे काका डॉ. परशुराम शिंदे, सरपंच प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव, उपसरपंच समीर सय्यद, मधुकरराव जाधव, सय्यद अल्ताफ, हंसराज जाधव, नारायणराव जाधव, समाधान जाधव, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि समस्त ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये प्रगती करत असल्याने गावातील लोकांमध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे.
