महात्मा गांधी महाविद्यालयात ‘मानव विज्ञान विद्या शाखा अभ्यास मंडळाचे’ उद्घाटन
अहमदपूर( गोविंद काळे ) महात्मा गांधी महाविद्यालयात दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी ‘मानव विज्ञान विद्या शाखा अभ्यास मंडळाचे’ उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. पी. पवार होते, तर श्री. बंकटस्वामी वरिष्ठ महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्रो. डॉ. पी. आर. कोंका यांनी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विचार विकास मंडळाचे सहसचिव सुरेशराव देशमुख आणि सिनेट सदस्य डॉ. विनोद माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वी गोलाच्या पूजनाने झाली. प्रो. डॉ. नितीन देशमुख यांनी प्रास्ताविक भाषणात या अभ्यास मंडळाच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना उपयोजनात्मक शिक्षण मिळावे, हा या मंडळाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटक प्रो. डॉ. पी. आर. कोंका यांनी GIS (भौगोलिक माहिती प्रणाली) या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये GIS चा वापर कसा वाढत आहे, याचे महत्त्व पटवून दिले. तसेच, या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून, त्यासाठी त्यांनी विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. पी. पवार यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. अशा अभ्यास मंडळांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक उपक्रमात हिरीरीने सहभागी व्हावे, असे प्रोत्साहनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील नॅक समन्वयक डॉ. अनिल जाधव, स्टाफ सेक्रेटरी डॉ. अनिल कांबळे, तसेच प्राध्यापक डॉ. शाम शिंदे, डॉ. दिलीप बंजारा, डॉ. राजश्री जाधव, प्रा. अर्जुन आणि प्रा. जोंधळे यांच्यासह मानव विज्ञान विद्याशाखेचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत बेंबडे यांनी केले, तर किशोर समुखराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
