श्रावण मासातील अनुष्ठानाने दूर होतात मनाच्या आणि शरीराच्या व्याधी – गुरु शिवलिंग शिवाचार्य
अहमदपूर ( गोविंद काळे ) – सूक्ष्म शिवतत्त्वाचे चिंतन म्हणजेच अनुष्ठान या विषयी प्रतिपादन करताना राज शेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य यांनी सांगितले की, श्रावण महिना हा शिवतत्त्वाचा महिना आहे आणि या काळात सूक्ष्म शिवतत्त्वाचे चिंतन केल्याने मनाच्या आणि शरीराच्या व्याधी दूर होतात. अहमदपूर येथील भक्ती स्थळात श्रावण मास तपो अनुष्ठान मौनमुक्ती सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.
गुरु शिवलिंग शिवाचार्य यांनी सांगितले की, श्रावण महिन्यात अहिंसा, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य यासारख्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. ते स्वतः २१ दिवस मौन पाळून, लिंब आणि बेलाच्या पानांचा रस सेवन करून त्रिकाल पूजा करत असत. असे केल्याने मनाच्या आणि शरीराच्या व्याधी दूर होण्यास मदत होते. त्यांनी भक्तांनाही आपली दैनंदिन दिनचर्या बदलून षडविकार दूर करणारी जीवनशैली आत्मसात करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यावेळी व्यासपीठावर भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी महाराज, अध्यक्ष भगवंतराव पाटील चांभार्गेकर, मामा शिवप्रसाद कोरे आणि बाबुराव देशमुख उपस्थित होते. मौनमुक्तीच्या निमित्ताने मोहन कौवडे गुरुजी यांचे कीर्तन झाले, तर हजारो भाविकांच्या उपस्थितीत जंगम अर्चना होऊन गुरुवर्यांचे अनुष्ठान संपन्न झाले.
हे अनुष्ठान यशस्वी करण्यासाठी हावगीराव देवणे, शिवलिंग पाटील, निळकंठ बिराजदार, पद्मिनी ताई खराडे, चंद्रकांत हैबतपुरे, मारुती भालके, पांडुरंग पळसकर, शिवा बेळसांगवी, गणेश मुरुडकर, नागनाथ कलशेट्टी, वैजनाथ मुंरडे, वर्षाताई देशमुख, शीला शेटकर, रतिकांत स्वामी तोंडारकर, महादेव आप्पा लामतुरे, जगदीश स्वामी गंथडे आप्पा, धर्म आप्पा, श्रीराम यांनी सहकार्य केले. या संकीर्तन सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते.
