धडकनाळ बोरगावला पूराचा तडाखापूरग्रस्तांच्या मदतीला धावले – मातृभूमी प्रतिष्ठान, मदतीसह , विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहिम
उदगीर (प्रतिनिधी) धडकनाळ बोरगाव येथे झालेल्या ढगफुटी पावसाने गावकऱ्यांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. गावातील अनेक घरांत पाणी शिरून संसार उध्वस्त झाला असून अन्नधान्य, कपडे, जनावरे आणि घरगुती वस्तू वाहून गेल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधार दाटला आहे, तर पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची टंचाई भेडसावत आहे. प्रत्येक घरातून हताशेचा आवाज येत असतानाच, समाजातील काही संवेदनशील हात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
यात मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांच्या नेतृत्वाखालील टीमने गावाला भेट देऊन पूरग्रस्तांना गावात पुरामुळे निर्माण झालेली अस्वच्छता दूर करण्यासाठीही प्रतिष्ठानने मोठी मोहिम हाती घेतली.
या मोहिमेत मातृभूमी महाविद्यालय आणि कस्तुरबाबाई नर्सिंग स्कूलचे तब्बल 100 विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून उतरले. हातात फावडे, झाडू घेऊन विद्यार्थ्यांनी रस्ते, नाले आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. पुराच्या पाण्यातून साचलेला गाळ व कचरा दूर करताना गावकऱ्यांच्या डोळ्यांत दिलासा दिसून आला.
यावेळी पूरग्रस्तांचा आढावा घेण्यासाठी अचानक पोहचलेल्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर – घुगे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यांनी एनएसएसच्या या विद्यार्थ्यांचा समाज कार्याचा भाव पाहून तोंडभर कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या व मातृभूमी प्रतिष्ठानच्या कार्याला सलाम केला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. उषाताई कुलकर्णी यांनी स्वतः गावाची विदारक स्थिती पाहून हळहळ व्यक्त केली.
पूरामुळे झालेले नुकसान हे अपरिमित असले तरी संकट काळात उभा केलेला मानवी सहकार्याचा पूलच गावाला नवजीवन देऊ शकतो, असा संदेश मातृभूमी प्रतिष्ठानच्या उपक्रमातून अधोरेखित झाला. गावकऱ्यांनीही या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत “संकटात समाज उभा आहे, हीच खरी ताकद आहे” असे सअश्रू आवाजात सांगितले.
