किशोरवयीन मुलींसाठी शाळेत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन कार्यक्रम

0
किशोरवयीन मुलींसाठी शाळेत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन कार्यक्रम

उदगीर (प्रतिनिधी) श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे पाचवी ते दहावीतील विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी विशेष आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी सामान्य रुग्णालय उदगीरचे अधिकारी डॉ.भाग्यश्री सूर्यवंशी, डॉ. गजेंद्र राठोड, औषध निर्माण अधिकारी महेश नवाडे, परिचारिका सुवर्णा बिरादार या वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञांनी उपस्थित राहून विद्यार्थी, विद्यार्थिनींची तपासणी केली. तसेच आठवी, नववी, दहावीतील विद्यार्थिनींना आरोग्य विषयक महत्त्वपूर्ण माहिती सांगितली.
विशेषत: आठवी, नववी व दहावीतील मुलींनी मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छतेची काळजी, संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व, रक्तअल्पता (ॲनिमिया) टाळण्यासाठी आवश्यक आहारघटक, तसेच दैनंदिन जीवनातील व्यायामाचे फायदे, या विषयांवर सामान्य रुग्णालय उदगीरचे अधिकारी डॉ. भाग्यश्री सूर्यवंशी यांनी सविस्तर चर्चा केली. मानसिक आरोग्य जपण्यासाठी ध्यान, योग व संवादाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
या वेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र राठोड, महेश नवाडे आणि परिचारिका सुवर्ण बिरादार यांनी विदयार्थी, विद्यार्थिनींची उंची, वजन, रक्तदाब, हिमोग्लोबिन चाचणी इत्यादी तपासण्या केल्या. तपासणी दरम्यान आढळून आलेल्या आरोग्यविषयक अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयात उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांबद्दल माहिती देऊन त्यांचा सकारात्मक पद्धतीने सामना कसा करावा ? याबाबतही मार्गदर्शन झाले.
या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी मनमोकळेपणाने आपले प्रश्न मांडले. डॉक्टरांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य तो सल्ला दिला. यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वासाची जाणीव निर्माण झाली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही. नादरगे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!