महात्मा गांधी महाविद्यालयात ‘जय विज्ञान, जय अनुसंधान’ दिवस साजरा

0
महात्मा गांधी महाविद्यालयात 'जय विज्ञान, जय अनुसंधान' दिवस साजरा

​अहमदपूर (गोविंद काळे): विचार विकास मंडळाच्या महात्मा गांधी महाविद्यालयात नुकताच जय विज्ञान, जय अनुसंधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष ॲड. किशनराव बेंडकुळे होते.
​आपल्या भाषणात ॲड. बेंडकुळे यांनी विज्ञान आणि संशोधनाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, भारताने प्रगतीचे शिखर गाठले आहे. आपल्या वैज्ञानिकांनी नवनवीन शोध लावून मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने चंद्रावर पाऊल ठेवून जगासमोर एक नवा इतिहास रचला आहे. देशाला महासत्ता बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
​कार्यक्रमात विचारपीठावर मंडळाचे सहसचिव सुरेशराव देशमुख, प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, प्रमुख मार्गदर्शक डॉ. सी. टी. लोंढे, मेजर डॉ. ए. एम. शिंदे, आणि लेफ्टनंट जी. व्ही. ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
​प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार म्हणाले की, शेती, उद्योग, रेल्वे, बँकिंग आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांच्या विकासात आपल्या वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे. त्यांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आजच्या तरुणांवर आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
​प्रमुख मार्गदर्शक डॉ. सी. टी. लोंढे यांनी भाषणात विविध घोषणांचा इतिहास सांगितला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान हा नारा दिला. १९९८ च्या यशस्वी अणुचाचणीनंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जय विज्ञान हा नारा दिला. त्यानंतर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी जय विज्ञान, जय अनुसंधान हा नारा दिला, असे डॉ. लोंढे यांनी सांगितले. तसेच, त्यांनी चांद्रयान-३ चंद्रावर कसे उतरले, याबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर डॉ. अनिता शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन आर. डी. गुळवे यांनी केले. आभार प्रदर्शन लेफ्टनंट जी. व्ही. ताटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील राठोड, दीपक दुर्गे, हनुमंत पौळ, आणि होनराव यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि एन.सी.सी. कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!