रशियात शिवरायांवर पोवाडा गाणारे अण्णाभाऊ साठे – डॉ. नरसिंह भिकाणे
अहमदपूर ( गोविंद काळे): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मानखेड ता अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी अण्णाभाऊंच्या कार्याला उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये जाऊन “मी साडेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील मराठी भाषेतून बोलत आहे,” असे सांगून मराठी बाणा दाखवला आणि छत्रपती शिवरायांवर पोवाडा गायला. हा रशियामध्ये गायलेला शिवरायांवरील पहिला पोवाडा होता.
यावेळी व्यासपीठावर बालाजी सांगुळे, मनसेचे अतिष गायकवाड, रवी पाटील, गौतम कांबळे, चंद्रकांत सांगुळे आदी उपस्थित होते.
डॉ. भिकाणे पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी काढलेल्या मोर्चाचा उल्लेख करत “ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है” असे म्हटले होते. आजही देशात साम्यवाद लागू नसल्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत आहे. यामुळेच अण्णाभाऊंनी त्या काळात भांडवलशाहीला विरोध करून लेनिन यांच्या मार्क्सवादी विचारांचे समर्थन केले होते.
केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी ‘फकिरा’, ‘चित्रा’, ‘सुलतान’ यांसारख्या ३५ कादंबऱ्या, तसेच ‘वळण’, ‘सापळा’, ‘कोंबडी चोर’, ‘उपकाराची परतफेड’ यांसारख्या १३ लघुकथा, अनेक पोवाडे, लावण्या आणि नाटके लिहिली. त्यांचे साहित्य जागतिक स्तरावर २५ ते ३० भाषांमध्ये अनुवादित झाले आहे, असेही डॉ. भिकाणे यांनी सविस्तरपणे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतिष गायकवाड यांनी केले. याप्रसंगी मानखेड येथील विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या आणि पेन यांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
