पिकविमा व अनुदान ७ दिवसांच्या आत जमा करा – विवेक जाधव
उदगीर (एल पी उगिले) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील पुलांवरून पाणी वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुग, उडीद, तुर, सोयाबीन आदी खरीप हंगामी पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहेत. हाताशी आलेले मूग-उडीद पिके तसेच नुकतीच फवारणी केलेली तुर व सोयाबीनची पिके मुसळधार पावसामुळे डोळ्यादेखत नष्ट झाली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असूनही ना पिकविमा मिळाला, ना शासकीय मदत मिळाली, अशी खंत शेतकऱ्यांत आहे.
या वर्षी शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप पेरणी केली होती. मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे आता पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर,ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा भरला आहे, त्यांना सरसकट १००% पिकविम्याचा लाभ मिळावा. यासाठी विमा कंपनीला त्वरित आदेश द्यावेत. सरकारने सरसकट अतिवृष्टी अनुदान मंजूर करून पुढील ७ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष विवेक पंडितराव जाधव यांनी शासनाकडे केली आहे.
शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर कोणताही विलंब न करता सरकारने ठोस निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. अन्यथा, प्रतिवर्षाप्रमाणे शेतकऱ्यांवर अन्याय होत राहिला तर युवक काँग्रेसचा पवित्रा आक्रमक राहील, असा इशारा युवक काँग्रेस उदगीरचे तालुकाध्यक्ष विवेक पंडितराव जाधव यांनी दिला आहे.
